पाटणा - माझे वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर सर्व लोक राजकारण करत आहेत. ते जिवंत होते तेव्हा कोणीच त्यांना भेटायला आले नाही, असा आरोप लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे जितनराम मांझी यांनी माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. यावर बोलताना चिराग यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
'जे लोक अशापद्धतीने माझ्यावर आरोप करत आहेत त्यांना थोडी लाज वाटायला हवी. मांझी यांना मी फोनवरून माझ्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. मात्र, ते कधीच भेटायला आले नाहीत. जेव्हा माझे वडील रुग्णालयात होते तेव्हा मांझीजी का भेटायला आले नाहीत', असा सवाल चिराग यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येकजण आज मृत व्यक्तीवर राजकारण करत आहे, असेही ते म्हणाले.
मांझी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र -
'हिंदुस्तानी अवाम मोर्चाने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यानंतर चिराग यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रामविलास पासवान यांच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. मात्र, त्यांचे सुपूत्र चिराग दुसऱ्याच दिवशी हसताना दिसले. त्यांनी अनेकांना मुलाखती दिल्या. यामुळे चिराग यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते', असेही या पत्रात म्हटले आहे.
पत्रात करण्यात आले सवाल -
'रामविलास पासवान ज्या रुग्णालयात दाखल होते त्या रुग्णालय प्रशासनाने कोणाच्या सांगण्यावरून मेडिकल बुलेटिन जारी केले नाही? तसेच कोणाच्या सांगण्याहून पासवान यांना केवळ ३ लोकच भेटू शकत होते', असे सवालही त्या पत्रात विचारण्यात आले आहेत. ८ ऑक्टोबरला पासवान यांचा मृत्यू झाला होता.
काही दिवसांपूर्वी चिराग यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ते आपल्या वडिलांच्या प्रतिमेसमोर उभे राहून भाषणाचा सराव करताना दिसून आले. २ मिनिटांची ही व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. तसेच जनता दल युनायटेडने सुद्धा चिराग तितके दु:खी नसल्याचे म्हटले आहे.
चिराग यांचे स्पष्टिकरण -
'माझे वडील गेल्यामुळे मी किती दु:खी आहे हे कुणालाही दाखवायची गरज मला वाटत नाही, असे चिराग यांनी या घटनांबाबत बोलताना सांगितले. नितीश कुमार इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करतील, याचा विचार कधीच केला नव्हता, असेही चिराग म्हणाले.