नवी दिल्ली - भारतीय नागरिकांच्या आरोग्यापेक्षा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प जास्त महत्त्वाचा आहे का? असा सवाल कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी केंद्र सरकारला विचारला. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जाब विचारला आहे.
या व्हिडिओत प्रियांका गांधींनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला अत्यावश्यक सेवांच्या यादीत टाकण्यामागचे कारण विचारले. तसेच देशात कोरोनामुळे एवढी अराजकता, भिती आणि भयंकर वातावरण असताना बांधकामठिकाणी मजूर आणि इतरांना का दिवसरात्र केवळ तुमच्या हट्टासाठी काम करायला लावत आहात, असा आरोप करत हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी त्याला अत्यावश्यक सेवांच्या यादीत टाकला आहे, असंही त्या म्हणाल्या. तसेच तर हा प्रकल्प लोकांच्या जीवापेक्षा महत्वाचा आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने सप्टेंबर 2020 ते जानेवारी 2021 या काळात आयसीयू बेड्स 46 टक्के, व्हेंटिलेटर बेड्स 28 टक्के आणि ऑक्सिजन बेड्स 36 टक्क्यांनी कमी केल्याचा आरोपही प्रियांका गांधींनी केला आहे. तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता तरीही केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचंही गांधी म्हणाल्या.
भाजपाने सत्तेत आल्यानंतर त्यांनी आरोग्य बजेटमध्ये २० टक्क्यांनी कपात केली. तसेच सर्वच राज्यांमध्ये एम्स उभारण्याची घोषणा केली, जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सुधारण्याचेही आश्वासन त्यांनी दिले, मात्र, यातील कोणतंच आश्वासन आणि घोषणा त्यांनी पूर्ण केली नाही, अशी सडकून टीका प्रियांका गांधींनी मोदी सरकारवर केली आहे.