नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला अचानक हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकवल्यानंतर वादंग सुरू झाले आहे. काही शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धू नावाच्या व्यक्तींवर शेतकऱ्यांना फडकवण्याचा आरोप केला आहे. सोशल माध्यमांवर दीप सिद्धू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता सनी देओलसोबतेचे छायाचित्र व्हायरल झाले. यानंतर दीप सिद्धू कोण आहेत, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया...
कोण आहे दीप सिद्धू -
दीप सिद्धू यांचा जन्म 1984 मध्ये पंजाबमधील मुक्तसरमध्ये झाला आहे. ते एक मॉडल आणि अभिनेता आहेत. 'रमता जोगी' या चित्रपटातून त्यांनी सिनेक्षेत्रात प्रवेश केला. तसेच त्यांनी 2019 मध्ये गुरुदासपूर येथून भाजपा उमेदवार सीन देओल यांच्यासाठी प्रचार केला होता. मात्र, लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर सनी देओल यांनी ट्विट करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
भाजपाचा कार्यकर्ता ?
शेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर दीप सिद्धू यांनी सक्रिय सहभाग घेतला. खेड्या-पाड्यात जाऊन त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत प्रचार केला. यावेळी अनेकदा त्यांनी फुटीरतावादी विधाने केली. ज्याचा शेतकरी संघटनांनी विरोध दर्शवला. युवा शेतकऱ्यांमध्ये दीप सिद्धू यांची लोकप्रियता अधिक आहे. त्यांनी अनेकदा फेसबूक लाईव्ह घेत, शेतकऱ्यांना संबोधीत केले होते. अनेक शेतकरी संघटनाच्या नेत्यांनी त्यांच्यावर भाजपाचा हस्तक असल्याचा आरोप केला. मात्र, हा आरोप सिद्धू यांनी नाकारला होता. सोशल माध्यमांवर दीप सिद्धू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता सनी देओलसोबतेचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.
संघर्षाची जबाबदारी दीप सिद्धूने स्वीकारली -
शेतकरी संघटनांनाची पोलिसांची चर्चा सुरू असताना दीप सिद्धू यांनी गँगस्टर लक्खा सिंह सिधाना यांची काही शेतकऱ्यांसोबत भेट घेतली. शेतकरी नेते सरकारसोबत चर्चा करत आहेत. मात्र, त्यातून काहीच तोडगा निघत नाही. त्यामुळे आपण दिल्लीत घुसू आणि लालकिल्यावर जाऊ, असे दीप सिद्धू यांनी शेतकऱयांना संबोधताना म्हटलं. कडेकोट सुरक्षेत आंदोलक शेतकऱ्यांनी सिंघु आणि गाझीपूर सीमेवरुन दिल्लीत प्रवेश केला. तेव्हा काही शेतकरी आंदोलकांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंग्यापासून लांब आणखी एक झेंडा फडकावला. या गटात दीप सिद्धू पाहायला मिळाले. या संघर्षाची जबाबदारी दीप सिद्धू यांनी स्वीकाली आहे.
आंदोलनकांनी फडकवलेला झेंडा कोणता -
लाल किल्ल्यावर तिरंग्यापासून लांब अंतरावर एक झेंडा फडकवण्यात आला. हा खलिस्तानी झेंडा असल्याचे वृत्त सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. मात्र, ते वृत्त खोटे असून संबधित झेंडा झेंड्याला ‘निशाण साहेब’ म्हणातात. तसेच त्या झेंड्यावरील चिन्हाला ‘खंडा’ असं म्हटलं जातं. या झेंड्यामध्ये दोन कृपाण, दुधारी तलवार, आणि एक चक्र आहे. शिख धर्मातील खालसा पंथाचा तो झेंडा होता.
हिंसक आंदोलनाला दीप सिद्धू जबाबदार -
आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराला शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धूला जबाबदार धरलं आहे. दीप सिद्धू यांनी काही शेतकऱ्यांना भडकवून आंदोलनाला धार्मिक रुप दिलं. दीप सिद्धू लाल किल्ल्यावर कसा पोहचला. पोलिसांनी त्याला का रोखलं नाही. तो सरकारचा हस्तक आहे. लाल किल्ल्यावर जे काही झालं त्यास दीप सिद्धू जबाबदार आहे, असे शेतकरी नेते सतनाम सिंह पन्नू यांनी म्हटलं आहे. तथापि, आंदोलनात 300 पोलीस जखमी झाले आहेत. तसेच सरकारी संपत्तीचेही मोठे नुकसान झाले आहे.
दीप सिद्धूने फेटाळले आरोप -
शेतकरी नेत्यांनी दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. त्यावर दिप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही", असं दिप सिद्धू यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे. यासोबतच त्यानं फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दीप सिद्धू कालपासून सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे.