बंगळुरू : कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकमधील मतांचे जातनिहाय गणित बघता कोणत्या समुदायातील नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समुदायाचे वर्चस्व निर्विवाद आहे. राज्याच्या सत्तेची गणिते ठरविण्यात लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरतात. त्यामुळे लिंगायत समाजातील एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळते की लिंगायत समाजाव्यतिरिक्त इतर समुदायातील नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ज्यांची नावे चर्चिली जात आहेत, त्यापैकी मुरुगेश निराणी आणि अरविंद बेल्लाड हे लिंगायत समुदायातील नेते आहेत.
याशिवाय कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समाजानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वोक्कालिगा समुदायातील नेत्यांचीही नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. यात अश्वथ नारायण आणि सीटी रवी यांची नावे येतात. त्यामुळे लिंगायतेतर समुदायातील मुख्यमंत्रीही कर्नाटकात बघायला मिळू शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असणारे प्रल्हाद जोशी हे ब्राह्मण समुदायातील नेते आहेत. त्यामुळे मतांच्या गणितात त्यांचे पारडे जड नसले तरी केंद्रीय नेतृत्वातील वजन लक्षात घेता त्यांनाही मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - कोण होणार कर'नाटक'चा मुख्यमंत्री, हे आहेत संभावित चेहरे