नवी दिल्ली : पावसाने ओढ दिल्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील बळीराजाच्या चिंतेत भर घालणारा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत देशभरात चांगल्या पावसाचे संकेत नसल्याचे हवामान विभागाने बुधवारी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता
15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र, गुजरातसह पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य भारत आणि उर्वरीत भागात मान्सून कमजोर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 16 ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण वाढू शकते असे विभागाने म्हटले आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार तसेच पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची स्थिती 14 ऑगस्टपर्यंत कायम राहू शकते असे विभागाचे म्हणणे आहे.
तामिळनाडू, केरळमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज
तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढचे पाच दिवस तुरळक ते चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या देशात मान्सूनची स्थिती कमजोर असून ही स्थिती 15 ऑगस्टपर्यंत कायम राहू शकते.
देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा 5 टक्के कमी पाऊस
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1 जून ते 10 ऑगस्ट या कालावधीदरम्यान देशभरात सामान्यपेक्षा 5 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्व आणि ईशान्येकडील भागात यादरम्यान 12 टक्के तर वायव्य आणि मध्य भारतात अनुक्रमे दोन आणि सात टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण भारतात मात्र यादरम्यान सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा - महाबळेश्वरने अनुभवला सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस