चमोली : जोशीमठमधील आपत्तीग्रस्तांच्या अडचणी काही कमी होत नाहीत. मारवाडी येथील जेपी कंपनीजवळ पाण्याच्या गळतीची पातळी कमी झाली असावी. मात्र आता सिंहधर ते नृसिंह मंदिरादरम्यान बद्रीनाथ महामार्गाच्या बाजूला जमिनीखालून अचानक नवीन पाण्याचा प्रवाह फुटला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी 10.30 वाजता नरसिंह मंदिराजवळील मैदानातून अचानक पाणी आल्याचे वृत्त समजताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. जमिनीखालून घाण पाणी येत असल्याचे पाहून पुन्हा एकदा घबराट पसरली आहे.
जोशीमठमध्ये नैसर्गिक जलस्रोत कोरडे : आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एकीकडे दरड कोसळल्याने जोशीमठमध्ये नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडत आहेत. तर दुसरीकडे जोशीमठमध्येच विविध ठिकाणांहून भूगर्भातील पाणी बाहेर येत आहे. यावरून एक मोठी भूवैज्ञानिक हालचाल आजही जोशीमठात होत असल्याचा अंदाज बांधता येतो.
पुनर्बांधणीची कामे केली जाणार : जोशीमठच्या उपजिल्हाधिकारी कुमकुम जोशी यांनी सांगितले की, जोशीमठ येथील नरसिंह मंदिराजवळ जमिनीतून पाण्याचा नवा प्रवाह दिसला आहे. जोशीमठ येथे तैनात भूवैज्ञानिक तज्ज्ञांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, उत्तराखंड सरकारने स्पष्ट केले की, जोशीमठ भूस्खलनाचा अभ्यास अहवाल आल्यानंतरच किती क्षेत्र असुरक्षित आहे हे ठरवले जाईल. त्याच तत्त्वावर परिसरात पुनर्बांधणीची कामे केली जाणार आहेत.
यापूर्वीची घटना : जोशीमठमध्ये यापूर्वी झालेल्या भूस्खलनामुळे घरांमध्ये आणि शेतात भेगा पडल्या होत्या. काळानुसार या घरांना भेगा वाढत होत्या, त्यामुळे येथील लोकांचे राहणे धोक्यात आले होते. प्रशासनाने तडे असलेली ८६३ घरे ओळखली असून त्यापैकी १८१ घरे असुरक्षित क्षेत्रात आहेत. जोशीमठ येथील भूस्खलनामुळे २८२ कुटुंबांतील ९२७ लोकांना बाधित झाले होते. त्यांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले होती. जोशीमठ येथे दरड कोसळल्याने शेकडो कुटुंबांना घरे सोडावी लागली होती. नागरिकांत भीतीचे वातावरण दिसून आले होते.
वीज आणि पाण्याची बिले माफ करण्याच्या सूचना : आता ते बाधितांचे विस्थापन, पुनर्वसन आणि नुकसान भरपाईची मागणी करत होते. त्याचवेळी या दुर्घटनेमागे एटीपीसी वीज प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा हात असल्याचे स्थानिकांचे मत होते. त्यामुळे स्थानिकांमध्येही संताप व्यक्त होत होता. जोशीमठ भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना धामी सरकारने मोठा दिलासा दिला होता. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नोव्हेंबर 2022 पासून 6 महिन्यांची वीज आणि पाण्याची बिले माफ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला होता. जोशीमठ भूस्खलनग्रस्तांना धामी सरकारने मोठा दिलासा दिला होता.