दिवाळीत (Diwali) फराळाशिवाय (Diwali snacks) वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी असते. मग अशावेळी जिभेवर ताबा ठेवायचा कसा... वजन वाढण्याची भीती (Fear of gaining weight) असतेच. कारण एकतर घरी पाहुणे आलेले असतात किंवा मग आपण कुणाकडे तरी पाहुणे म्हणून गेलेलो असतो. या दोन्ही प्रकारांमध्ये मग भरपूर जेवण तर होतच, पण फराळाच्या तेलकट, तुपकट, गोड पदार्थांवरही यथेच्छ ताव मारला जातो. त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो. मग मोठ्या प्रयत्नांनी आटोक्यात आणलेला वजनाचा काटा पुन्हा एकदा झर्रकन वर जातो. वजन आटोक्यात रहावे, यासाठी काही टिप्स फाॅलो करा.
दिवाळीत वजन वाढू नये यासाठी काही टिप्स (Tips to prevent weight gain during Diwali):
1. फराळाला बसतो तेव्हा प्रमाणात खा. एखादा पदार्थ आवडला म्हणून आपण तो भरपूर खातो. त्याच्या जोडीने बाकीचे पदार्थही खातो. हे खाताना अनेक जणांना आपण किती खातो, आहोत हेच लक्षात येत नाही. त्यामुळे फराळ करताना कोणता पदार्थ किती खात आहात, याच्याकडे लक्ष ठेवा.
2. दिवाळीचा फराळ शक्यतो घरीच बनवलेला असावा. विकतचा फराळ तळताना त्याच त्या तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केलेला असतो. त्यामुळे वजन वाढण्याची तसेच इतर आजार होण्याची शक्यता जास्त असते.
3. दिवाळीच्या दिवसांत पाणी किंवा लिक्विड भरपूर प्या. त्यामुळे तळलेले पदार्थ खाल्ल्याचा आरोग्यावर किंवा त्वचेवर परिणाम होणार नाही.
4. गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा. जेवायला बसल्यावर सगळ्यात आधी भाज्या, सलाड जास्तीतजास्त खाण्यावर भर द्या. त्यानंतर मग तळलेले आणि गोड पदार्थ खा.
5. जेव्हा कुणाकडे फराळाला किंवा जेवणाला जाणार असाल, तेव्हा त्याच्या आधी शक्यतो डाएटिंग करा. शक्यतो हेवी खाणे टाळा.
6. एखादा आजार असल्यास त्या आजाराशी संबंधित पत्थ्ये पाळा.