उडुपी - कर्नाटकाच्या उडुपी शहरातील हेजामाडी गावाच्या सीमेत टोलनाका आहे. यामुळे गावातील वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी गावच्या संरपचांनी राष्ट्रीय महामार्ग टोलगेट अधिकाऱ्यांना केली. मात्र, त्यांनी नकार दिला. यानंतर टोलनाका टाळण्यासाठी गावकऱ्यांनी क्लृप्ती शोधत गावातील गाड्यांसाठी वेगळा रस्ता तयार केला. यानंतर मात्र, राष्ट्रीय महामार्ग टोलगेट अधिकाऱ्यांनी गावातील गाड्यांना टोल देयेतून सूट दिली आहे.
हेजामाडी गावातील लोकांना टोलनाका पार करून जावे लागत होते. टोलनाका हा गावाच्या सीमेत येतो. त्यामुळे गावातील लोकांना टोलमाफी होती. मात्र, उडुपी टोलवे प्रायवेट लिमिटेडने (एनयूटीपीएल) नवा नियम काडत हेजामाडी एनएच टोलगेटवर गावातील वाहनांची मोफत ये-जा थांबवली. तेव्हा अध्यक्ष प्रणेश यांच्या अध्यक्षतेखाली हेजामाडी ग्रामपंचायतीने टोलनाक्याच्या बाजूने नवा रस्ता बांधला.
हा रस्ता 30 मार्चला तयार करण्यात आला. या रस्त्यावरून गावातील लोक टोल न भरता ये-जा करत होते. यानंतर टोलनाका अधिकाऱ्यांनी फक्त हेजमाडी ग्रामपंचायतीतील सर्व हलकी मोटार वाहने, कार, खासगी बसगाड्या टोल देयेतून सूट दिली आहे. या वाहनांची कागदपत्रे ग्रामपंचायत हद्दीतील पत्त्यावर नोंदवलेली असणे गरजेचे आहे.
गावातील वाहनांना टोल सूट -
टोलनाका टाळण्यासाठी समांतर रस्ता बनविणे हा ग्रामपंचायतीतील 21 सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला होता. राष्ट्रीय महामार्ग ते हेजमाडी - कोडी दरम्यान धावणाऱ्या गावातील गाड्यांकडून टोल वसूल करत नव्हते. मात्र, त्यांनी 23 मार्चपासून टोल सूट थांबविली. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर करून निवेदन सादर केले. त्यांनी आमच्या मागणीवर विचार करण्यास सहमती दर्शविली. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा आम्ही टोलगेटच्या बाजूने एक रस्ता तयार केला. त्यानंतर एनयूटीपीएलच्या मॅनेजरने विनंती करत आम्हाला काम थांबवण्यास सांगितले. गावातील वाहनांना टोल सूट देण्यास मान्य केले. यासंदर्भात एनयूटीपीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला याबाबत पत्र पाठविले, असे हेजमाडी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रणेश हेजमाडी यांनी सांगितले.