नवी दिल्ली - राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संसद आणि विधिमंडळात होणाऱ्या गोंधळावर चिंता व्यक्त केली. संसदेत गोंधळ घातल्याने चर्चेत बाधा निर्माण होते. यामुळे लोकशाही आणि देशाचे नुकसान होते. संसदेत याचप्रकारे गोंधळ होत गेल्यास लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडेल, असे व्यंकय्या नायडू म्हणाले. माजी खासदार आणि हैदराबाद इथले शिक्षणतज्ज्ञ नुकला नरोथम रेड्डी यांच्या जन्मशताब्दी समारंभात ते बोलत होते.
संसद आणि विधिमंडळामध्ये 3 डी व्यवस्थेचे पालन झाले पाहिजे. या व्यवस्थेअंतर्गत मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे. गोंधळ घातल्याने मुद्दा मागे राहतो. त्यामुळे जनतेचे हित प्रभावित होते. काही राज्यांच्या विधानसभांमध्ये नुकत्याच झालेल्या घटना मन विदीर्ण करणाऱ्या आहेत. संसदेतील खासदारांनी जनहितासाठी कार्य करावे, असे ते म्हणाले.
जीवनात मूल्य टिकवने गरजेचे -
संसद आणि विधिमंडळांमधला व्यत्यय आणि चर्चेचा खालवलेला दर्जा म्हणजे पर्यायाने लोकशाहीची आणि देशाचीही घसरण आहे, सार्वजनिक जीवनात मूल्य टिकवून ठेवायला हवीत, असेही ते म्हणाले.
मुख्य मुद्यांवर चर्चा करताना संसद रिकामी -
रेड्डी यांच्या काळातील संसदेतील कार्यप्रणालीचा त्यांनी उल्लेख केला. त्या काळी लोकांचे हित प्रथम स्थानी होते. त्यानुसारच चर्चा होत. गरज पडल्यास रेड्डीही सल्ला देत. मात्र, आता चर्चा करताना व्यत्यय येतो. तसेच संसदेत आमदार आणि खासदार उपस्थित राहत नाहीत. काही महत्वपूर्ण विषयावर चर्चा करताना संसद रिकामी असते, असेही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा - शोपियन भागात चकमक, एका अतिरेक्याला मारण्यात सैनिकांना आले यश