हैदराबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी ठरत असून; ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीरअभावी कित्येक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशात सध्या दिवसाला सरासरी चार हजार रुग्णांचा मृत्यू होतो आहे. यामध्येच, गाजावाजा करत केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
जवळपास सर्व राज्यांना या फंडमधून व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र सध्या परिस्थिती अशी आहे, की या व्हेंटिलेटर्सनाच व्हेंटिलेटरची गरज आहे. कौतुकाने दिलेल्या या व्हेंटिलेटर्सना वापरण्यासाठी संबंधित रुग्णालयाकडे कितपत व्यवस्था आहे हे तपासण्याचीही तसदी प्रशासनाने घेतली नव्हती. त्यामुळे कित्येक रुग्णालयांमध्ये हे व्हेंटिलेटर्स धूळ खात पडलेले दिसून येत आहेत. पाहूयात, कोणत्या राज्यात काय परिस्थिती आहे..
बिहार :
बिहारच्या कोणत्याही शब्दकोषामध्ये 'सुव्यवस्था' हा शब्दच नाही. बिहारला पीएम केअर्स योजनेमार्फत केंद्राकडून ३० व्हेंटिलेटर मिळाले होते. मात्र, यातील एकही व्हेंटिलेटर वापरण्यात आला नाहीये. कारण, हे व्हेंटिलेटर्स वापरण्यासाठी राज्यात पुरेसे तंत्रज्ञच नाहीत. त्यामुळे हे सर्व व्हेंटिलेटर जसे पॅक होऊन आले होते, तसेच पडून आहेत. संपूर्ण राज्यात असेच एकूण २०७ व्हेंटिलेटर पडून आहेत. गेल्या वर्षी १,७०० तंत्रज्ञांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, त्याचे निकालच अजून जाहीर करण्यात आले नाहीत.
पंजाब :
पंजाबला पीएम केअर फंडातून ८०९ व्हेंटिलेटर मिळाले होते. यांपैकी केवळ ५५८ व्हेंटिलेटर वापरण्यात येत असून, २५१ तसेच पडून आहेत. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये हे व्हेंटिलेटर इन्स्टॉल करण्यासाठी केवळ एका अभियंत्याची भरती करण्यात आली आहे. दुसरीकडे, गुरु गोविंद सिंग वैद्यकीय महाविद्यालाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पीएम केअर फंडातून ८२ व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र, यातील ६२ व्हेंटिलेटर हे सुरुवातीपासूनच निकामी होते. मात्र, जर हे पहिल्यापासूनच निकामी होते, तर तेव्हाच ते बदलण्यात का आले नाहीत हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्नाटक :
कर्नाटकला केंद्राकडून ३,०२५ व्हेंटिलेटर्स मिळाले होते. यांपैकी सध्या केवळ १,८५९ व्हेंटिलेटर्स वापरण्यात येत आहेत. बाकी १,१६६ व्हेंटिलेटर्स तसेच पडून आहेत. कर्नाटकमध्ये आतापर्यंत देशातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद झालेली असताना अशी परिस्थिती आहे. हे व्हेंटिलेटर्स न वापरण्यासाठी तांत्रिक कारणे पुढे करण्यात येत आहेत.
राजस्थान :
पीएम केअर्स फंडातून राजस्थानला १,९०० व्हेंटिलेटर मिळाले होते. या सर्व व्हेंटिलेटर्सची तपासणी करण्यात आली असून, त्यांपैकी ९० टक्के व्हेंटिलेटर सुस्थितीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तर बाकी दहा टक्के व्हेंटिलेटर्सना तांत्रिक अडचणी येत असून, त्या दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, याठिकाणीदेखील तंत्रज्ञांच्या अभावामुळे कित्येक व्हेंटिलेटर्सचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.
हिमाचल प्रदेश :
हिमाचलला ५०० व्हेंटिलेटर्स मिळाले होते. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या मे महिन्यापर्यंत यांपैकी केवळ ४८ व्हेंटिलेटर वापरण्यात आले आहेत. तसेच, बाकी ४५२ व्हेंटिलेटर्सची राज्याला गरज पडली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचलमध्ये व्हेंटिलेटरची गरज पडणाऱ्या रुग्णांची संख्या अगदीच कमी आहे. त्यामुळे एवढेच व्हेंटिलेटर वापरण्यात आले आहेत. बाकी सर्व व्हेंटिलेटर सुस्थितीत असल्याचे रमेश यांनी सांगितलेय
केरळ :
पीएम केअर फंडातून केरळला ४८० व्हेंटिलेटर मिळाले होते. यांपैकी ३६ व्हेंटिलेटर्स तांत्रिक बिघाडामुळे पडून आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.
उत्तराखंड :
उत्तराखंडला पीएम केअर फंडातून मिळालेल्या ७०० व्हेंटिलेटर्सपैकी ६७० वापरण्यात येत आहेत. बाकी ३० व्हेंटिलेटर्स बसवण्यासाठी अभियंते नसल्यामुळे ते तसेच पडून आहेत. सध्या राज्यात हे व्हेंटिलेटर इन्स्टॉल करण्यासाठी एकही अभियंता मिळत नाहीये. आरोग्य विभागाच्या महासंचालक तृप्ती बहुगुणा म्हणाल्या की यांपैकी एकही व्हेंटिलेटर खराब नाही. सध्या मुंबई किंवा इतर राज्यांमधून अभियंत्यांना पाचारण करण्यात येत आहे.
छत्तीसगड :
छत्तीसगडला मिळालेल्या २७० व्हेंटिलेटर्सपैकी ७० निकामी होते. त्यांच्या दुरुस्तीनंतर त्यांपैकी ६० वापरण्यायोग्य झाले, तर १० अजूनही खराब असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली :
देशाच्या राजधानीला कोरोनाच्या दोन्ही लाटांचा जबर तडाखा बसला. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक राहिले आहे. दिल्लीला मिळालेले सर्व ९९० व्हेंटिलेटर्स वापरण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये मिळून सध्या एकूण १,२०० व्हेंटिलेटर्स आहेत.
एका व्हेंटिलेटरमुळे कित्येक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे जेव्हा रुग्णालयांना हे लक्षात येतं, की आपल्याकडील व्हेंटिलेटर खराब आहे, तेव्हाच तो का बदलून घेतला जात नाही? जर तो वापरण्यासाठी तंत्रज्ञ नाही, तर त्या पदासाठी तातडीने भरती का घेतली जात नाही? तसेच काही राज्यांना जर आवश्यकतेपेक्षा जास्त मशीन मिळाल्या आहेत, तर अधिकच्या मशीन आवश्यकता असलेल्या राज्यांमध्ये का नेल्या जात नाहीत? असे असंख्य प्रश्न ही परिस्थिती पाहून उपस्थित होतात. मात्र, ही संपूर्ण व्यवस्थाच जर व्हेंटिलेटवर आहे, तर गरीब जनतेने काय करायचं? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
हेही वाचा : भारत लवकरच चीनला टाकणार मागे; ठरणार सर्वाधिक लोकसंख्येचा देश