वाराणसी - हिंदू धर्मात मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्कारानंतर अस्थी विसर्जनाची परंपरा आहे. हे अस्थी विसर्जन नदीत केले जाते. वाराणसी, प्रयागराज, हरिद्वारमध्ये अस्थीचे विसर्जन आणि श्राद्ध करतात. यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभेल, अशी धारणा आहे. कोरोना महामारीमुळे गंगेत अस्थीचे विसर्जन करणे शक्य नाही. यामुळे टपाल विभागाच्या पुढाकाराने 'ओम दिव्य दर्शन' नावाची सामाजिक-धार्मिक संस्था एक अनोखा उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत टपाल विभागाच्या माध्यमातून अस्थी संस्थेकडे पाठवण्यात येतील. 'ओम दिव्य दर्शन' संस्था अस्थींचे धार्मिक विधीवत विसर्जन करेल.
कशी करावी नोंदणी?
ओम दिव्य दर्शन संस्थाच्या htpp://omdivysdarshan.org या पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणीनंतर अस्थी टपाल विभागामार्फत स्पीड पोस्टाने वाराणसी, प्रयागराज, हरिद्वारला पाठवण्यात येतील. अस्थींना योग्य प्रकारे पॅक करून बॉक्सवर मोठ्या अक्षरात 'ओम दिव्य दर्शन' असे लिहावे. स्पीड पोस्ट बूक केल्यानंतर संबंधिताने ओम दिव्य दर्शन संस्थाच्या पोर्टलवर स्पीड पोस्ट बार कोड क्रमांकासह बुकिंग डिटेल्स अपडेट कराव्या.
विधिवत अस्थी विसर्जन आणि श्राद्ध -
टपाल विभागामार्फथ अस्थीचे पॅकेट ओम दिव्य दर्शनाच्या पत्त्यावर पोचविले जाईल. यानंतर ओम दिव्य दर्शन संस्था पंडितांच्या माध्यमातून पूर्व निर्धारित वेळेनुसार विधिवत अस्थी विसर्जन आणि श्राद्ध करण्यात येईल. मृतकाच्या कुटुंबीयांना ते वेबकास्टद्वारे पाहता येईल. तसेच संस्कारानंतर गंगा पाण्याची एक बाटली देखील टपाल ऑफिसमार्फत मृत व्यक्तीच्या कुटुंबाला संस्थेमार्फत पाठविली जाईल.