नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे भारतीय नागरिक विविध देशांमध्ये अडकून पडले होते. त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' योजना सुरू केली होती. ज्याद्वारे आत्तापर्यंत 6.75 कोटी नागरिकांना भारतात परत आणले गेले आहे.
जगात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणणे हाच केवळ उद्देश या मोहिमेचा नसून हे एक आशा आणि आनंदाचे मिशन आहे. संकटाच्या या काळातही लोकांना परत घरी आणले जात आहे. 6.75 कोटी लोकांना परत आणल्यानंतरही ही योजना चालूच आहे, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून म्हटले आहे.
परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने 7 मे 2020 पासून जगातील सर्वात मोठी मोहीम सुरू केली. या योजनेंतर्गत 1.9 लाखाहून अधिक भारतीय नागरिकांना परत आणण्याचे नियोजन होते. या अभियानामध्ये प्रथम एअर इंडिया आणि त्याच्या सहायक एअर इंडिया एक्सप्रेसने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर इतर विमान कंपन्याही यात सहभागी झाल्या. भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात आणण्यासाठी हवाई मार्गाबरोबरच जलमार्गाचाही वापर करण्यात आला, जहाजांद्वारेही लोकांना मायदेशी आणण्याचे कार्य करण्यात आले.
हेही वाचा - आरोप धक्कादायक, गृहमंत्री अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा; फडणवीसांची मागणी