नवी दिल्ली - शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रमाणपत्राची वैधता संपुष्टात आणली असून आता ही वैधता आयुष्यभर राहणार आहे. ही घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे.
2011 ला परीक्षा पास झालेल्यांना हा निर्णय लागू होणार आहे. म्हणजेच ज्या उमेदवारांनी 2011 मध्ये टीईटी पास केली होती. त्यांचे टीईटी प्रमाणपत्र हे कायमस्वरुपी वैध असणार आहेत. तर 2011 च्या आधी टीईटी परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांसाठी हा नियम लागू होणार नाही.
सात वर्षांचा कालावधी समाप्त झालेल्या उमेदवारांसाठी नवे शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्र नव्याने उपलब्ध करणे ही कार्यवाही संबंधित राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश करतील, असे पोखरियाल यांनी सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टिने हे सकारात्मक पाऊल असल्याचे पोखरियाल म्हणाले.
शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता कायमस्वरुपी -
सरकारी शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पास करणे महत्वाचे आहे. यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता ही केवळ 7 वर्षांची होती. एखाद्याने 2011 साली परीक्षा पास केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे 2018 पर्यंतच वैध रहायचे. आता मात्र, हे प्रमाणपत्र कायमस्वरुपी वैध राहणार आहे.