भारतात दर वर्षी १६ मार्च हा गोवर रोगप्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो. जीवघेण्या रोगाबद्दल समाजात जागरुकता आणण्यासाठी आणि त्यासाठी लस घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्यासाठीचा हा दिवस आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ही लस सुरक्षित आणि अगदी कमी खर्चिक असली तरीही २०१८ मध्ये जगभरात गोवराने १,४०,००० जणांचा मृत्यू झाला. यात मुख्यत: ५ वर्षांखालील मुले होती. २००० ते २०१८ मध्ये जगभरात या लसीमुळे गोवर मृत्यूच्या संख्येत ७३ टक्के घट झाली.
गोवर हा विषाणूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे आणि त्यावर उपचार होत नाहीत. गोवर प्रतिबंधित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, जे सुरक्षित आणि प्रभावी दोन्ही आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, १९६३ मध्ये ही लस आली आणि लसीकरण सुरू झाले. पण त्याआधी गोवरचा साथीचा रोग दर २ – ३ वर्षांनी जोरदार पसरायचा. त्यामुळे दर वर्षी २.६ दशलक्ष मृत्यू व्हायचे. पण २००० ते २०१८ मध्ये जगभरात या लसीमुळे गोवर मृत्यूच्या संख्येत ७३ टक्के इतकी घट झाली.
गोवर म्हणजे नक्की काय आहे ?
गोवर हा विषाणूमुळे होतो. पॅरामाइक्सोव्हायरसशी तो संबंधित आहे आणि जेव्हा संक्रमित व्यक्तीला खोकला किंवा शिंक येते, तेव्हा हवेद्वारे गोवर पसरतो. हा विषाणू सहसा श्वसनमार्गामध्ये प्रवेश करतो आणि हळूहळू संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. इतरांच्या तुलनेत लस न घेतलेल्या लहान मुलांना जास्त धोका असतो. पण लस न घेतलेल्या गर्भवती महिला आणि लस घेऊनही रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नाही, अशा व्यक्तींना गोवरचा संसर्ग होऊ शकतो.
गोवर आजाराची लक्षणे
गोवरचा संसर्ग झाल्यानंतर साधारणपणे ७ ते १४ दिवसांत लक्षणे दिसू लागतात आणि दिवसेंदिवस ती जास्त गुंतागुंतीची होतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार संसर्ग झाल्यानंतरची लक्षणे पुढीलप्रमाणे –
१. गोवरचा संसर्ग झाल्यानंतर १४ दिवसांनी पहिली लक्षणे
खूप ताप ( १०४ अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकतो ) खोकला, नाक वाहणे, लाल डोळे, डोळ्यात पाणी येणे ( जळजळ होणे )
२. लक्षणे दिसल्यानंतर २ ते ३ दिवसांनी शरीरावर डाग
छोटे पांढरे डाग तोंडाच्या आत येतात. संसर्गानंतर २ ते ३ दिवसांनी हे डाग दिसू लागतात.
३. लक्षणे दिसू लागल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी गोवराची पुरळ येते
लक्षणे सुरू झाल्यानंतर ३ ते ५ दिवसांनी गोवराची पुरळ शरीरावर दिसू लागते. सपाट लाल रंगाचे डाग केसाजवळ चेहऱ्यावर आधी दिसू लागतात आणि नंतर मान, गळा, हात, पाय आणि पावले इथे पसरू लागतात.
सपाट लाल डागाला उंटवटाही येऊ शकतो. हे डाग डोके आणि सगळ्या शरीरावर पसरतात. जेव्हा अशी पुरळ येते, तेव्हा अंगात १०४ अंश ताप असतो.
गोवर झाला तर होणारे इतर आजार पुढीलप्रमाणे –
- कानाला संसर्ग
- अतिसार, ज्यामुळे डिहायड्रेशन देखील होऊ शकते
- न्यूमोनिया, ब्राँकायटिस
- एन्सेफलायटीस
- गर्भधारणेदरम्यान समस्या
- डोळ्यात संसर्ग ( डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह )
- अंधत्व
लसीबद्दल माहिती
भारताच्या राष्ट्रीय आरोग्य पोर्टल ( एनएचपी ) मध्ये म्हटले आहे, ‘ जागतिक आयोग्य संघटनेने सर्व मुलांसाठी लसीचे २ डोस सांगितले आहेत. एकच डोस किंवा गोवर रुबेला किंवा गोवर मम्प्स असे देता येतात. भारतात गोवर लस ही जागतिक प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत दिली जाते. गोवर रुबेला ही ९ ते १२ महिन्यात दिली जाते आणि दुसरा डोस हा १६ ते २४ महिन्यात दिला जातो.