डेहराडून (उत्तराखंड): उत्तराखंडच्या जोशीमठमधील घरांना आणि जमिनींना पडलेल्या भेगांमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. निसर्गाशी छेडछाड केल्याने काय परिणाम होऊ शकतात, हेच यातून दिसून येत आहे. उत्तराखंडमधील जलविद्युत प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांमध्येही अशाच प्रकारे निसर्गाशी छेडछाड झाली तर परिस्थिती अत्यंत धोकादायक होणार आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वेमार्ग असो की केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत असलेले इतर प्रकल्प असोत, यामुळे तज्ज्ञांना चिंता वाटत आहे.
उत्तराखंड होणार बोगद्यांचे राज्य: ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्ग असो किंवा उत्तराखंडमधील सर्व ठिकाणी बोगदे बांधण्यात येत आहेत. यासाठी आगामी काळात आणखी डोंगर फोडले जाणार आहेत. त्यामुळे धोका वाढवू शकतो. येत्या 5 वर्षात उत्तराखंड हे देशातील पहिले असे डोंगराळ राज्य असेल ज्यात सर्वाधिक बोगदे आहेत. उत्तराखंडची भौगोलिक स्थिती अधिक चांगल्या प्रकारे जाणणाऱ्या वैज्ञानिकांसाठी हे बोगदे आता चिंतेचे कारण बनत आहेत. ज्या प्रकारे पर्वत खोदून तयार केले जात आहेत, ते भविष्यासाठी चांगले नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
पर्वतांमध्ये वेगाने सुरु आहे बांधकाम: उत्तराखंडमधील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या 126 किलोमीटरच्या ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 50 किलोमीटरचे बोगदे तयार करण्यात आले आहेत. मात्र, उत्तराखंडमध्ये उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पातील सर्व वैज्ञानिक बाबींचा अभ्यास करूनच काम केले जात असल्याचे रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अधिकारी अनेकदा सांगत आहेत.
70 टक्के रेल्वे मार्ग जाणार डोंगरांमधून: उत्तराखंडमधील ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गात ऋषिकेश ते कर्णप्रयागपर्यंत सुमारे 12 स्थानके बांधली जात आहेत. त्यापैकी 17 बोगदे बांधण्यात येत आहेत. सध्याच्या रेल्वे प्रकल्पात, सुमारे 126 किलोमीटरचा प्रवास करणारी रेल्वे 70% पर्वतांखालून जात आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचेल. देशातील दुसरा सर्वात लांब बोगदा उत्तराखंडमध्येच बांधला जात आहे, ज्याची लांबी सुमारे 14 किलोमीटर असेल. देवप्रयागपासून जनसूपर्यंत त्याचे बांधकाम सुरू झाले आहे.
बोगद्याच्या बांधकामात होणारे ब्लास्टिंग धोकादायक : नॉर्वेसारख्या देशातही वर्षानुवर्षे डोंगराच्या खालून रेल्वे आणि रस्त्याची कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे उत्तराखंडमध्ये उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पात कोणतीही अडचण येऊ नये, याचीही काळजी घेतली जात आहे. परंतु, जोशीमठमध्ये ज्या प्रकारे परिस्थिती निर्माण होत आहे, त्यादृष्टीने या आराखड्यांतर्गतही डोंगराखाली ब्लास्टिंग करून अनेक प्रकारची कामे पूर्ण केली जात आहेत. भविष्यात त्याचे काय परिणाम होतील याचे उत्तर मात्र कोणाकडे नाही.
६०० वर्षांपूर्वी बांधलेला बोगदा आजही सुरक्षित : पर्यावरणवादी कार्यकर्ते नयन बहुगुणा म्हणतात की, उत्तराखंडमधील मलेठा येथे माधोसिंग भंडारी यांनी बांधलेल्या बोगद्याला आजपर्यंत कोणतीही अडचण आलेली नाही. त्यावेळी स्फोट करण्यात आलेला नव्हता. उलट संपूर्ण बोगदा हाताने बनवला गेला. सुमारे 600 वर्षांपूर्वी महान योद्धा माधोसिंग भंडारी यांनी डोंगर फोडून दोन किलोमीटर लांबीचा बोगदा करून नदीचे पाणी आपल्या गावात आणले होते. हा बोगदा आधुनिक अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना आहे. आजपर्यंत हा बोगदा सुरक्षित आहे.