राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत सध्या आपत्तीग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यांनी या दुर्घटनेत एकूण दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
उत्तराखंड महाप्रलय : आतापर्यंत २४ मृतदेह आढळले; दोन हजार कोटींच्या नुकसानाची शक्यता - चमोलीत हिमकडा कोसळून दुर्घटना
19:35 February 08
मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू; दोन हजार कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता..
19:34 February 08
आतापर्यंत २४ मृतदेह मिळाले..
उत्तराखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत विविध ठिकाणांहून २४ मृतदेह मिळाले आहेत. ठिकठिकाणी बचावकार्य सुरू असून, अद्यापही कित्येक लोक बेपत्ता आहेत.
19:32 February 08
पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शाहांनी घेतला परिस्थितीचा आढावा..
पंतप्रंधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उत्तराखंडच्या खासदारांशी चर्चा केली. या दुर्घटनेमध्ये कशा प्रकारे बचावकार्य सुरू आहे याचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.
15:37 February 08
आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू, तर २०२ बेपत्ता..
उत्तराखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत सुमारे २०२ लोक बेपत्ता आहेत. तर, आतापर्यंत १९ लोकांचे मृतदेह मिळाले आहेत. सध्या तपोवनमधील एनटीपीसी पॉवर प्रोजेक्टच्या एका बोगद्यातील कामगारांना वाचवण्याचे काम सुरू आहे. या बोगद्यात अडकलेल्या लोकांना पोलीस, एसडीआरएफ आणि आयटीबीपीच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे.
09:46 February 08
मोठ्या बोगद्यातील 80 मीटरपर्यंतचा गाळ काढला
बचावकार्य सुरू असलेल्या मोठ्या बोगद्यातील सुमारे 80 मीटर लांबीपर्यंतचा गाळ आतापर्यंत उपसण्यात आला आहे. हा बोगता 180 मीटर लांबीचा आहे. या बोगद्यात 30 ते 40 मजूर अडकले आहेत. बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी याची माहितीद दिली आहे.
08:18 February 08
आतापर्यंत 15 जणांना वाचविले
बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत 15 जणांना वाचविण्यात आले असून 14 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती चमोली पोलिसांनी दिली आहे
08:00 February 08
बचावकार्य राबविण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे
गाळाखाली दबलेल्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. श्वान पथकाच्या मदतीने बचावकार्य राबविले जात आहे.
07:55 February 08
बचाव कार्यासाठी यंत्रांचीही मदत घेतली जात आहे
पुरामुळे आलेला गाळ उपसण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे. गाळ उपसून जिवंत व्यक्तींचा शोध या ठिकाणी घेतला जात आहे.
07:54 February 08
आयटीबीपीच्या जवानांकडून बचावकार्य सुरू
आयटीबीपीचे जवान तपोवन बंधाऱ्याजवळील बोगद्यात बचावकार्य राबवित आहेत. या ठिकाणी आलेल्या गाळात जिवंत व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणाहून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
07:28 February 08
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये सोमवारी सकाळीही बचावकार्य सुरूच आहे
चमोली : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये रविवारी हिमकडा कोसळून झालेल्या महाप्रलयात आतापर्यंत १९ जण ठार, तर २००हून अधिक जण बेपत्ता झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेत बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू करण्यात आला. अजूनही बचावकार्य या ठिकाणी राबविले जात आहे. या महाप्रलयंकारी दुर्घटनेवर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी एक महाकाय हिमकडा कोसळला. कोसळलेल्या हिमकड्यामुळे ऋषीगंगा आणि धौलीगंगा नदीला प्रलयंकारी महापूर आला. अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे नदीतील पाणीपातळी वाढून पाण्याच्या प्रवाहाची गतीही कैकपटीने वाढली. त्यामुळे नदी पात्राबाहेरून ओसंडून वाहू लागली. अचानकच निर्माण झालेल्या या अभूतपूर्व स्थितीमुळे नदीकिनाऱ्याजवळील परिसरात मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ माध्यमांमधून लगेचच समोर आले. त्यामुळे या महाप्रलयाच्या भीषणतेचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
दुर्घटनेत मोठे नुकसान..
- नदीवरील तपोवन बंधाऱ्याचेही या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय धौलीगंगा आणि ऋषीगंगा नदीवरील पूलही या दुर्घटनेत वाहून गेल्याची माहिती आहे.
- ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाचा पावर हाऊस या दुर्घटनेत पूर्णपणे नष्ट झाला आहे.
- स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून इतर २०० जण बेपत्ता आहेत.
- तपोवन बंधाऱ्यानजिकच्या बोगद्यात काम करणारे 50 तर ऋषीगंगा प्रकल्पातील 85 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या दोन्ही ठिकाणी बचावकार्य राबविले जात आहे.
- याशिवाय या दुर्घटनेत 4 स्थानिक नागरिक बेपत्ता झाले आहेत. 180 बकऱ्या या प्रलयंकारी पुरात वाहून गेल्या.
- 17 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. धौलीगंगा आणि ऋषीगंगासोबतचा संपर्कही पूर्णपणे तुटला आहे.