हैदराबाद - उत्तर प्रदेश निवडणूक 2022 निकालाकडे (Uttar Pradesh Assembly Election Result 2022) सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश (UP Election Result 2022) हे देशातील सर्वात मोठे राज्य आहेच. पण राजकीय दृष्ट्यादेखील हे सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांसाठी एकूण ७ टप्प्यात मतदान झाले (7 Phase Election in UP) आहे. राज्यातील 76 जिल्ह्यांमधून 4442 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात होते. या सातही टप्प्यांसाठीचा निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहे.
- बहुमताचा आकडा 202 -
उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. उत्तर प्रदेशात ४०४ विधानसभा आणि विधान परिषदेत १०० सदस्य आहेत. उत्तर प्रदेशात सध्या भाजपाचे सरकार आहे. तर मुख्य विरोधी पक्षात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा समावेश आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०४ सदस्यांमध्ये ४०३ निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
- उत्तर प्रदेशमधील 2017 ची परिस्थिती
२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने 325 जागांवर घवघवीत यश प्राप्त करत सत्ता स्थापन केली होती. भाजपाला निवडणुकीत एकूण ३९.६७ टक्के मते मिळाली होती. तर समाजवादी पक्षाने ४७ आणि बहुजन समाज पक्षाने १९ जागांवर विजय प्राप्त केला होता. काँग्रेसला केवळ सात जागाच प्राप्त झाल्या होत्या.
403 पैकी 325 जागा मिळवून भाजपने मित्र पत्राबरोबर गेल्या निवडणुकीत एक मजबूत सरकार दिले होते. एकट्या भाजपनेच 312 जागा खिशात घातल्या होत्या. त्या वेळी उत्तर प्रदेशात मोदींची लाट होती, असे म्हटले जाते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपने जाहीर केलेला नव्हता, तेव्हाचं हे घवघवीत यश आता पुन्हा मिळणार का हा प्रश्न आहे. योगी आदित्यनाथ सरकारला ते मागचे यश टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. योगी आदित्यनाथ भाजपला किमान बहुमताचा आकडा गाठून देऊ शकतात का हेच पाहणं महत्त्वाचे आहे.
दुसरीकडे समाजवादी पक्षाने गेल्या निवडणुकीत 47 जागा मिळवल्या होत्या. आता अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सायकल किती वेगाने आणि जोरात मुसंडी मारते हे पाहावे लागेल. खरी स्पर्धा ही भाजप आणि समाजवादी पक्षातच आहे. बाकी विरोधक तर भाजपपुढे सपशेल आपटले होते. यात सर्वाधिक हानी झाली होती काँग्रेसची. राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांचेही पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहेत. तसेच उत्तर प्रदेशचा भार प्रियांका गांधींवर सोपवण्यात आला होता. असे असूनही ऐतिहासिक दारुण पराभवाला काँग्रेसला सामोरे जावे लागते होते. काँग्रेसने गेल्या निवडणुकीत फक्त 7 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने जेमतेम 19 जागा जिंकल्या होत्या.
- शिवसेनेचे उत्तर प्रदेशात बाजी मारणार की डिपॉझिट जप्त होणार?
शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. शिवसेनेने गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत युती केली होती. तर, उत्तर प्रदेशात देखील शिवसेनेने 51 उमेदवार उभे केले होते. प्रचारासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील दोमारियागंज आणि कोरांव येथे जाहीर सभा घेतल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर मंत्री देखील उपस्थित होते.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं तेव्हा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी युपीत (UP) 60 जागांवर उमेदवार उभे करु आणि त्या 60 जागांवर शंभर टक्के जिंकूनच येऊ, असा निर्धार केला होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: युपीत प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या योगी आदित्यनाथ यांना माजी मुख्यमंत्री होण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते. तसेच शिवसेना सर्वच जागांवर निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. Exit Poll ची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीत शिवसेनेला कुठेच स्थान नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेची या निवडणुकीतही डिपॉझिट जप्त होते की काय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- निवडणुकांमधील गाजलेले मुद्दे -
राम मंदिर निर्माण
शेतकरी आंदोलन
हाथरस बलात्कार प्रकरण
लखीमपूर हिंसाचार
गंगेतील कोरोना बळींचे मृतदेह
- उत्तरप्रदेशातील 2017 चा निकाल
पक्ष | भाजप | एसपी | बीएसपी | काँग्रेस | इतर |
जागा | 325 | 47 | 19 | 07 | 05 |
सात टप्प्यांची आकडेवारी -
टप्पा | जागा | उमेदवार | टक्केवारी |
पहिला | 58 | 623 | 65.58 |
दुसरा | 55 | 586 | 64.77 |
तिसरा | 59 | 627 | 61.61 |
चौथा | 59 | 624 | 59.77 |
पाचवा | 61 | 692 | 55.15 |
सहावा | 57 | 676 | 55.70 |
सातवा | 54 | 613 | 54.18 |
- कोणत्या टप्यात कधी आणि किती झाले मतदान?
पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी 65.58 टक्के मतदान
दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी 64.77 टक्के मतदान
तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी रोजी 61.61 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी रोजी 59.77 टक्के मतदान
पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी रोजी 55.15 टक्के मतदान
सहाव्या टप्प्यात 3 मार्च रोजी 55.70 टक्के मतदान
सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी 54.18 टक्के मतदान
- खालील लढतींकडे असणार खास लक्ष -
भाजप -
1) योगी आदित्यनाथ - योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी नेते उमेंद्र शुक्ला यांच्या पत्नी शुभावती शुक्ला यांना समाजवादी पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली. 19 मार्च 2017 रोजी योगींनी यूपीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगी आदित्यनाथ यांनी 1998 साली वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी लोकसभा निवडणूक जिंकून खासदार म्हणून शपथ घेतली. योगी आदित्यनाथ यांचा जन्म 05 जून 1972 रोजी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात एका गढवाली क्षत्रिय कुटुंबात झाला.
2) केशव प्रसाद मौर्य : कौशांबी जिल्ह्यातील सिरथू विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात सपाकडून पल्लवी पटेल आणि बसपाकडून मुंसब अली उस्मानी यांना उमेदवारी दिली. केशव प्रसाद मौर्य हा आरएसएस-भाजपचा मौर्य चेहरा आहे. केशव प्रसाद मौर्य हा भाजपसाठी ओबीसी मतांचा वापर करण्यासाठी मोठा चेहरा मानला जातो. सुरुवातीच्या काळात केशव प्रसाद मौर्य हे आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित होते.
3) सिद्धार्थनाथ सिंह : सिद्धार्थनाथ सिंह हे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आहेत. सिद्धार्थनाथ सिंह हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. सिद्धार्थनाथ सिंह हे अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात सपाचे अमरनाथ मौर्या रिंगणात आहेत.
4) श्रीकांत शर्मा : ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा हे मथुरा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आहेत. कृषी कायदे आणि जाट आंदोलनाचा परिणाम या मतदारसंघावर आहे. शर्मा यांच्याविरोधात सपाचे देवेंद्र अग्रवाल आणि बसपाचे एस के शर्मा रिंगणात आहेत. श्रीकांत शर्मा यांना राजकारणात येण्यापूर्वी क्रिकेटपटू व्हायचे होते. परंतु, काळाच्या ओघात त्यांची सामाजिक आणि राजकीय बाबींमध्ये रस वाढत गेला. शिक्षणादरम्यान ते राजकारणाकडे वळले आणि अभाविपमध्ये सामील झाले.
5) राजेश्वर सिंह : भाजपने लखनौच्या सरोजिनीनगर मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तिकीट दिले आहे. राजेश्वर सिंह हे ईडीचे माजी सहसंचालक राहिले आहेत. अलीकडेच त्यांनी सेवेतून निवृत्ती घेतली आणि ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 24 तासांच्या आतच त्यांना विधानसभेचे तिकीट जाहीर करण्यात आले.
समाजवादी पार्टी -
1) अखिलेश यादव : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री कार्यकाळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. अखिलेश यादव यांचा मुकाबला भाजप नेते व केंद्रीय मंत्री एसपी सिंग बघेल यांच्याशी होत आहे. अखिलेश यादव हे 2000 ते 2012 पर्यंत कन्नोजचे खासदार होते तर 2012 ते 2017 मध्ये ते आजमगडमधून खासदार राहिले. अखिलेश यादव 2012 ते 2017 पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. उत्तर प्रदेशच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. अखिलेश यादव यांचा जन्म 01 जुलै 1973 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. ते समाजवादी पक्षाचे सरदार आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आहेत.
2) शिवपाल सिंह यादव : शिवपाल सिंह यादव हे इटावा जिल्ह्यातील जसवंत नगर विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा सपाचे उमेदवार आहेत. समाजवादी पक्षाच्या कुटुंबातील भांडणानंतर त्यांनी 2018 मध्ये प्रगतीशील समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. मात्र, 2022 विधानसभा निवडणुकीच्या आधीच त्यांना त्यांचा नवीन पक्ष सपामध्ये विलीन केला आहे. शिवपाल सिंह यादव हे मुलायम सिंह यादव यांचे लहान भाऊ आहेत.
3) अब्दुल्ला आजम खान : समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांचे अब्दुल्ला आजम खान हे पुत्र आहेत. 2017 मध्ये ते स्वार विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. मात्र, जन्म दाखला प्रमाणपत्र प्रकरणामुळे हायकोर्टने त्यांची विधानसभा सदस्यता रद्द केली होती. त्यांच्याविरोधात अपना दलचे चिराग हैदर अली खान रिंगणात आहेत.
काँग्रेस
1) आराधना मिश्रा : काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांची मुलगी आहे. आराधना मिश्रा "मोना" या प्रतापगडच्या रामपूर खास विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. आराधना मिश्रा 'मोना'चा जन्म 20 एप्रिल 1974 रोजी प्रयागराज, यूपी येथे एका राजकीय कुटुंबात झाला. आराधना मिश्रा यांचे वडील प्रमोद तिवारी प्रतापगडच्या रामपूर खास मतदारसंघातून सलग 9 वेळा आमदार राहिले आहेत. त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
2) अजय राय : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय राय वाराणसीच्या पिंद्रा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पिंद्राच्या रणांगणात खेळणाऱ्या अजय राय यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षातून झाली. यानंतर ते समाजवादी पक्षात गेले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजय राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर काँग्रेस पक्षाचे लोकसभा उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली होती. मात्र, तेथे त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले
बसपा
1) अमनमणी त्रिपाठी : अमनमणी त्रिपाठी महाराजगंजच्या नौतनवा विधानसभा मतदारसंघातून बसपाचे उमेदवार आहेत. 2017 च्या निवडणुकीत ते नौतनवा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे वडील बाहुबली अमरमणी त्रिपाठी हे लक्ष्मीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिले आहेत. अमरमणी त्रिपाठी हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत.
अपना दल(के)
1) कृष्णा पटेल : अपना दल (कम्युनिस्ट) पक्षाचे प्रमुख कृष्णा पटेल हे प्रतापगड जिल्ह्यातील सदर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. या निवडणुकीत कुर्मी मतदारांना सामावून घेण्यासाठी सपा आणि अपना दल (कम्युनिस्ट) यांनी युती केली आहे.
- यूपीत पंतप्रधान मोदींच्या 31 सभा, तर शहांच्या 61 रॅली -
यूपी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी सुमारे 31 रॅली आणि रोड शो केले. त्यांनी 21 जानेवारी ते 5 मार्चपर्यंत झंझावात प्रचार केला. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी 5 ऑनलाइन रॅलींनाही संबोधित केले होते. बस्ती, महाराजगंज, अमेठी, प्रयागराज, बहराइच, हरदोई, पूर्वा, उन्नाव, रायबरेली, बिजनौर, सहारनपूर, बागपत, शामली, मुझफ्फरनगर, नोएडा, सीतापूर, हरदोई, कानपूर, वाराणसी, गाझीपूर, बलिया, मिर्झापूर आणि जौनपूर जिल्ह्यात पंतप्रधान मोदी रॅलींना संबोधित केले.
- योगी आदित्यनाथांनी तब्बल 200 हून अधिक सभांना केले संबोधित -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2022 च्या निवडणूक प्रचारात सर्वाधिक सभा घेतल्या, त्यांनी राज्यभरात सुमारे 204 सभा आणि रॅली घेतल्या. यानंतर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी 100 हून अधिक रॅली आणि सभा घेतल्या, तर उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी सुमारे 75 जाहीर सभांना संबोधित करून पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्माण केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुमारे 61 रॅली आणि रोड शो केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुमारे 31 रॅली आणि रोड शोद्वारे उमेदवारांचा प्रचार केला.
- 500 हून अधिक सभा, रॅलीद्वारे प्रियंका गांधींनी केला प्रचार -
काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवर प्रियंका गांधी यांनीही उत्तरप्रदेशात जोरदार प्रचार केला. डोअर-टू-डोअर, रॅली, सभा, रोड शो घेत प्रियंका गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. प्रियंका गांधी यांनी जवळपास 500हून अधिक रॅली, जाहीर सभा, व्हर्च्यु्अल सभा, गावोगाव बैठका घेत प्रचाराचा सपाटा लावला होता. प्रियंका गांधी यांनी 42 रोड शो, 167 रॅली, 291 हून अधिक ऑनलाईन पद्धतीने रॅली, तसेच 340 हून अधिक विधानसभा क्षेत्रामध्ये प्रियंका गांधी यांनी बैठका घेत प्रचार केला होता.
- राकेश टिकैत यांचा निकालावर प्रभाव?
भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तरप्रदेशात भाजपविरोधात जोरादार प्रचार केला आहे. लखनौ, प्रयागराज, मेरठसह 15 जिल्ह्यांमध्ये टिकैत यांनी सभा घेतल्या. मुख्य जिल्ह्यांमध्ये 20 पेक्षा अधिक बैठका आणि पत्रकार परिषद घेत भाजपविरोधात टिकैत यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे जवळपास 60 विधानसभा जागांवर टिकैत यांना प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.