नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये एकूण 577 पदांची भरती करणार आहे. रिक्त पदांपैकी, 418 रिक्त पदे अंमलबजावणी अधिकारी (EO) आणि लेखा अधिकारी (AO) साठी आहेत. उर्वरित 159 रिक्त पदे सहाय्यक भविष्य निधी आयुक्त (APFC) साठी आहेत. तपशीलवार जाहिरात लवकरच युपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर आणि 25 फेब्रुवारी 2023 च्या एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये प्रकाशित केली जाईल. तुम्ही www.upsconline.nic.in वर जाऊन 25 फेब्रुवारी 2023 पासून या भरतीसाठी अर्ज करू शकाल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च ठेवण्यात आली आहे.
युपीएससीची नोटिफिकेशन : नोटिफिकेशन अनुसार, अंमलबजावणी अधिकारी आणि लेखा अधिकारीच्या एकूण 418 पदांपैकी 204 अनारक्षित आहेत, तर 57 पदे अनुसूचित जाती, 28 अनुसूचित जमाती, 78 ओबीसी आणि 51 पीडब्लूडी साठी राखीव आहेत. सहाय्यक भविष्य निधी आयुक्ताच्या 159 पदांपैकी 68 पदे अनारक्षित आहेत, तर 25 अनुसूचित जाती, 12 अनुसूचित जमाती, 38 ओबीसी आणि 16 अपंगांसाठी राखीव आहेत. युपीएससी द्वारे साठी जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार आयोगाच्या पोर्टल upsconline.nic.in वर अर्ज करू शकतील.
भरतीसाठी पात्रता : यापूर्वी युपीएससीने 2020 मध्ये ही भरती केली होती. कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. त्यानंतर एकूण 421 पदांची भरती करण्यात आली. 2020 मध्ये झालेल्या भरतीच्या आधारावर यंदा भरतीसाठी पुढीलप्रमाणे पात्रता असू शकते. अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी, पात्रता - मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी, वयोमर्यादा - कमाल 30 वर्षे. केंद्र सरकारच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया : युपीएससी द्वारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी या पदांसाठी उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांचे वेटेज 75:25 असेल. सामान्य क्षमता चाचणी (01) शी संबंधित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न परीक्षेत विचारले जातील. परीक्षेची भाषा इंग्रजी आणि हिंदी असेल. परीक्षा 300 गुणांची असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील.