लखनौ- संपत्तीच्या वादातून सासरा आणि दिरांना तुरुंगात टाकण्याचा महिलेचा डाव उघडकीस आला आहे. महिलेनं सासरा आणि तीन दीरांविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. पतीची हत्या करून त्याचा मृतदेह लपविल्याचं महिलेनं तक्रारीत नमूद केलं होतं.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी महिलेचा सासरा आणि तीन दिराला अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. महिलेच्या पतीचा मृतदेह शोधण्याकरिता पोलीस कंबर कसून प्रयत्न करत होते. मात्र, अचानक प्रकरणाला वेगळं वळण लागलं. महिलेचा पती गुजरातमध्ये आढळला. ही माहिती समजताच पोलिसांनी महिलेसह तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. न्यायालयात खोटी माहिती देऊन तक्रार केल्याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.
पतीची हत्या करून मृतदेह लपविल्याचा आरोप- पोलीस अधीक्षक विनीत जयस्वाल यांच्या माहितीनुसार गोंडामधील बैसिया चैन गावातील गुडिया आणि तिचा पती रामकरन यांचा कुटुंबियासोबत संपत्तीवरून वाद होता. त्यामुळे पती व पत्नीने सासरा व तिन्ही दिरांना तुरुंगात पाठविण्यासाठी डाव रचला. काही दिवसांपूर्वीच गुडिया या महिलेनं न्यायालयात अर्ज केला. या अर्जात महिलेनं सासरे ननके आणि अर्जुन, श्याम आणि आज्ञाराम यांना अटक करण्याची मागणी केली. पतीची हत्या करून चौघांनी मृतदेह लपवून ठेवल्याचा महिलेनं अर्जात दावा केला होता. त्यानंतर न्यायालयानं अर्जाची गंभीर दखल घेत चौघांनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ५ जून २०२३ मध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. चारही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली.
पोलीसदेखील हैराण- आरोपींना अटक करूनही महिलेच्या पतीचा मृतदेह सापडला नव्हता. महिलेच्या पतीचा मृतदेह शोधण्याकरिता पोलिसांकडून काही पथके नेमण्यात आली. पोलिसांनी विविध ठिकाणी पथके पाठवूनही यश आलं नव्हतं. गुजरातमध्ये पोलीस पोहोचताच प्रकरणाला वेगळं वळण लागलं. कच्छ येथे महिलेचा पती रामकरण जिवंत असल्याचे पाहून पोलीसदेखील हैराण झाले. पोलिसांनी त्याला अटक करून गौंडा जिल्ह्यात आणले आहे. केवळ संपत्ती मिळविण्यासाठी मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याची रामकरननं पोलिसांकडे कबुली दिली. पती गुजरातमध्ये असतानादेखील विधवा झाल्याचं नाटक करणाऱ्या गुडियाला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा-