नवी दिल्ली - देशाच्या २०२१ मधील जनगणना ही जातनिहाय व्हावी, अशी मागणी रिपाआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. जर जातनिहाय जनगणना झाली तर कोणत्या समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले आहे, हे समजू शकेल. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, २०२१ मध्ये जातनिहाय जनगणना व्हावी, ही आरपीआयकडून मागणी करण्यात येत आहे. जातनिहाय जनगणनेने जातीभेद वाढेल, असे मत मांडणाऱ्यांना समर्थन देत नाही. पक्षाचा विस्तार केला जात असून लवकरच १ कोटी सदस्य करण्यात येतील, असे आठवलेंनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-पहिली लस टोचवून घेणाऱ्या मुंबईतील कोरोना योद्ध्यांशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचीत
शेतकऱ्यांनी घरी परत जावे-
रामदास आठवले यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. भारत हा लोकशाहीचा देश आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांनी आता घरी जायला हवे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायला पाहिजे. जर सरकारने कृषी कायदे मागे घेतले तर इतर लोकही दुसरे कायदे मागे घेण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. हे भारताच्या संसदेच्या प्रतिष्ठेसाठी चांगले नाही.
हेही वाचा-कोरोना लस सर्वसामान्यांना कधी? मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात...
अनुराग कश्यपवर कारवाई करण्यासाठी अमित शाह यांना पत्र लिहिणार
पुरावे देऊनही मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असल्याचे केंद्रीय मंत्री आठवले यांनी सांगितले. अनुराग कश्यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.