भिलवाडा (राजस्थान) Anurag Thakur on India Aghadi : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज भिलवाडा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक मोठे वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, सनातन धर्म नष्ट करण्याबाबत विरोधक बोलताय, त्याबद्दल मला इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगायचंय. सनातन कधीच संपणार नाही. यूपीए आघाडीचंं नाव बदलून इंडिया आघाडी असं करण्यात आलं, पण राजकारण्यांची वर्तणूक ही काँग्रेसची मानसिकता दर्शवते, अशी टीका त्यांनी केलीय.
राजस्थान सरकरावर टीका : भाजपाची परिवर्तन संकल्प यात्रा आज भिलवाडा जिल्ह्यातील शाहपुरा विधानसभा मुख्यालयात पोहोचली. दरम्यान विविध ठिकाणी परिवर्तन संकल्प यात्रेचं स्वागत करण्यात आलं. आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर परिवर्तन संकल्प यात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी शाहपुरा येथील सभेला संबोधित करताना बेरोजगारी, शिक्षण, शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार, खडी माफिया, कागद माफिया आदींबाबत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अनुराग ठाकूर सभेला संबोधित करताना म्हणाले की, जे काम काँग्रेस सरकार करू शकले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेनऊ वर्षात पूर्ण केलं.
140 कोटी भारतीयांचाही अपमान : परिवर्तन संकल्प यात्रेची सभा संपल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सनातन धर्मावरील वक्तव्याबाबत विरोधकांवर टीकेची झोड उठवली. सनातनचा नायनाट करण्याचा संकल्प करणाऱ्या इंडिया आघाडीच्या अहंकारी नेत्यांना माझं एवढंच म्हणंणे आहे की, संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याबरोबरच तुम्ही 140 कोटी भारतीयांचाही अपमान करत आहात. राजकारण्यांनी लक्षात ठेवावे की, देशात ना मुघल सनातनला नष्ट करू शकले, ना इंग्रज सनातनला नष्ट करू शकले. इंडिया आघाडीच्या लोकांनी सनातन धर्म आणि संविधान नष्ट करण्याचा ठेका का घेतला आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
भ्रष्टाचार लपवण्यासाठी नावात बदल : राजस्थानमधील काँग्रेस सरकार परिवर्तन यात्रेसाठी गर्दी जमत नसल्याचं सांगत आहे. त्यावर अनुराग ठाकूर म्हणाले की, हजारोंच्या संख्येनं झालेली गर्दी ही खोटी आहे का?. राजस्थानच्या जनतेनं परिवर्तन यात्रेसाठी आपला संकल्प केला आहे. राजस्थानच्या जनतेला महिलांवरील अत्याचार, पेपरफुटी, भ्रष्टाचार, खाणकाम, भूमाफिया यापासून मुक्ती मिळवायची आहे. इंडिया आघाडीच्या प्रश्नावर अनुराग ठाकूर म्हणाले की, काही लोकांनी आपला भ्रष्ट चेहरा लपवण्यासाठी यूपीए आघाडीचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांनी टूजी, स्पेक्ट्रमसह अनेक घोटाळे केले आहेत असा आरोप त्यांनी केलाय.
हेही वाचा -