नवी दिल्ली - आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची ९६वी जयंती आहे. त्यानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन, पियुष गोयल यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना पुष्पांजली वाहिली.
अटलबिहारी वाजपेयींचा थोडक्यात जीवन प्रवास -
भाजपाच्या संस्थापकांपैकी एक असलेले अटल बिहारी वाजपेयी केवळ एक प्रखर वक्ताच नव्हते तर एक शानदार कवी सुद्धा होते. संसदेमधील त्यांची भाषणे आजही प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान असताना त्यांनी देशाची अर्थव्यवस्था वर नेण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली होती. वाजपेयींनीच निर्माण केलेला सुवर्ण चतुष्कोण हा भारतातील सर्वात मोठा तर जगातील पाचव्या क्रमांकाचा महामार्ग प्रकल्प आज देशाला जोडून ठेवत आहे. 1996 मध्ये वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. मात्र, त्यांचे सरकार त्यावेळी 13 दिवसच टिकले होते. तर पुन्हा 1998 मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळीही त्यांचे सरकार 13 महिनेच होते. 1999 मध्ये वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. यावेळी त्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. 16 ऑगस्ट २०१८ला त्यांचे निधन झाले.