नवी दिल्ली - भारतात तयार करण्यात आलेली कोरोनावरील लस नव्या विषाणूवरही प्रभावी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (न्यू स्ट्रेन) आढळला असून जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही या नव्या विषाणूचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या घोषणेनंतर सर्वांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.
मागील सहा महिन्यात रुग्णसंख्या कमालीची घटली -
इंग्लडसोबतच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूविरोधातही भारतातील लस काम करेल. नव्या विषाणूविरोधात तयार करण्यात आलेली लस काम करणार नाही, याचा एकही पुरावा नाही, असे भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर के. विजय राघवन यांनी सांगितले. मागच्या सहा महिन्यांत आता देशात १७ हजारांपेक्षा कमी नवे कोरोनचे रुग्ण सापडत आहेत. दरदिवशी मृत्यू होणाऱ्यांची संख्याही ३०० पेक्षा कमी झाली आहे. यातील ५० टक्के मृत्यू झालेले रुग्ण ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत. तर ७० टक्के मृत्यू पुरुषांचा झाल्याची माहिती आरोग्य सचिवांनी दिली.
आणीबाणीसाठी लसीला परवाना देण्याची तयारी -
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि गुजरातमधील झायडस कॅडीला या तीन आघाडीच्या कंपन्या कोरोनावरील लस तयार करत आहेत. आणीबाणीच्या काळात लसीचा परवाना मिळण्यासाठीही काही कंपन्यांनी अर्ज केला असून या अर्जांची छानणी आणि पडताळणी सुरू आहे. केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकारांनी लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. लसीची शीतगृहात साठवणूक, पुरवठा, गोदामे, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि लस वाहतुकीची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.