नवी दिल्ली - उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचाराच्या प्रकरणातील आरोपी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी नेते उमर खालिद यांना दिल्लीच्या कोर्टाने गुरुवारी जामीन मंजूर केला. दिल्ली दंगलीत सहभागी असलेल्यांची ओळख पटविणे किंवा त्यांना अटक करणे बाकी आहे. फक्त याच एका कारणामुळे उमर खालीदला जास्त काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटलं.
न्यायाधीश विनोद यादव यांनी याप्रकरणी सुनावणी केली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर उमर खालिदला मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅपसुद्धा डाऊनलोड करणे न्यायालयाने बंधनकारक केले आहे. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीदला अटक करण्यात आली होती.
काय प्रकरण?
फेब्रुवारी 2020 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या दोन गटांत ईशान्य दिल्लीत मोठी दंगल उसळली होती. यात 53 नागरिकांचा मृत्यू झाला होता. प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हिंसाचार प्रकरणी तपास सुरू केला होता. या अंतर्गत आता उमर खालीदवर कारवाई करण्यात आली. उमरवर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोकांना भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
आम आदमी पार्टीचा निलंबीत नगरसेवक ताहीर हुसैनच्या विरोधात दिल्ली गुन्हे शाखेने चार्जशीट दाखल केली होती. यात नमूद केल्यानुसार, हिंसाचाराच्या एक महिन्यापुर्वी 8 जानेवारीला ताहीर हुसैन, उमर खालीद आणि खालीद सैफी यांची भेट झाली होती. यावेळी उमरने ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान देशात मोठी दंगल घडवून आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार प्रकरणी उमर खालीदला अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई