नवी दिल्ली - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढील वर्षी म्हणजेच २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमॅनिक राब यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी आज (मंगळवार) राब यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. द्विपक्षीय चर्चेसाठी राब हे सोमवारी भारत भेटीवर आले आहेत.
दोन्ही देशांतील संबंध वृद्धींगत करण्यासाठी पाऊल -
बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, आता ते दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला येणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही देशांतील संबंध एका नव्या उंचीवर नेण्यासाठी ही भेट महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.
जी -७ परिषदेला मोदींना निमंत्रण
ब्रिटनकडे यजमानपद असलेल्या पुढील वर्षीच्या जी-७ परिषदेला बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिल्याचे एकून आनंद झाला. तसेच जानेवारी महिन्यातील प्रजासत्ताक दिनाला येण्याचे निमंत्रण जॉन्सन यांनी आनंदाने स्वीकारले आहे. हा भारताचा सन्मान आहे. प्रजासत्ताक दिनाला जॉन्सन येत असल्याची घटना एका नव्या संबंधांची नांदी आहे. दोन्ही देशांतील संबंध यामुळे आणखी वृद्धींगत होतील, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणारे जॉन्सन हे ब्रिटनचे सहावे व्यक्ती ठरणार आहेत. १९९३ साली ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जॉन मेजर प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला आले होते. त्यानंतर जॉन्सन पहिल्यांदाच भारतात येत आहेत. याआधी ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.