चेन्नई : तामिळनाडूच्या थुटुकुडी जिल्ह्यातील नझारेथ गावामध्ये खजिन्याचा शोध घेणं दोघांना चांगलच महागात पडलं आहे. खजिन्यासाठी भुयार खोदताना श्वास गुदरमरल्याने रघुपती (४७) आणि निर्मल गंगापती (१७) या दोघांचा मृत्यू झाला आहे.
सहा महिन्यांपासून खोदत होते भुयार..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवामलाई (४०) आणि शिवावेलन (३७) हे दोन भाऊ गेल्या सहा महिन्यांपासून एक भुयार खोदत होते. आपल्या घराच्या मागील अंगणात खजिना मिळण्याच्या आशेने त्यांनी हे खोदकाम सुरू केले होते. यासोबतच त्यांनी बाजूने सात फुटांचे आणखी एक भुयार खणले होते. रघुपती आणि गंगापती हे दोघेही या भावंडांना भुयार खणण्यासाठी मदत करत होते.
असा उघडकीस आला प्रकार..
सिवावेलनची पत्नी रुपा ही या सर्वांना पाणी आणण्यासाठी भुयारापाशी आली होती. यावेळी ती चक्कर येऊन पडली. तिला शुद्धीवर आणतानाच भुयारामध्येही चौघे असल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. या चौघांना बाहेर काढल्यानंतर गंगापती आणि रघुपती यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या सर्वांनी विषारी वायूचा फटका बसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक गोविंद कुमार, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी, आणि अग्नीशामक दलाचे अधिकारी मुथुकुमार हे सर्व तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या शिवावेलन आणि शिवामलाई यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : भाजपा आमदार मारहाण प्रकरण : पंजाबच्या मुक्तसरमधील शेतकरी आंदोलन मागे