नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी आता आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. या हिंसाचारास शेतकरी नेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. स्वराज इंडिया संघटनेचे अध्यक्ष योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, भारतीय किसान युनियन हरयाणा विभागाचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांच्यासह ३७ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
राकेश टिकैत, जोगिंदर सिंग यांच्यावरही गुन्हा दाखल -
जय किसान आंदोलनाचे नेते अविका साहा, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यासह दर्शन पाल सिंह, सतनाम सिंग पन्नू, भूटा सिंग बुर्जगिल आणि जोगिंदर सिंग उघरान यांची नावेही एफआयआरमध्ये आहेत. दरम्यान हिंसाचारानंतर शेतकरी संघटनांत फूट पडली असून दोन संघटना आंदोलनातून बाहेर पडल्या आहेत. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा मोर्चाही रद्द करण्यात आला आहे.
दंगल पसरवणे, खुनाचा प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल -
भारतीय दंड विधानच्या विविध कलमांखाली शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखले आहेत. यामध्ये कलम १४७, १४८ (दंगल भडकावणे) १२० ब (गुन्हेगारी कट) ३०७ (खूनाचा प्रयत्न) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ३९४ पोलीस हिंसाचारात जखमी झाले. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. आत्तापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली असून ५० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.