Balasore Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन रेल्वे गाड्याच्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातस्थळावरील रेल्वेरुळावर असलेल्या ट्रेनचे अवशेष हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातस्थळावरील रेल्वेचे अवशेष रेल्वे रुळावरुन बाजुला करण्याचे काम रात्रभर चालू आहे.
युद्ध पातळीवर रेल्वेरुळ दुरुस्तीचे काम सुरू : उद्या म्हणजे 5 जूनपर्यंत रेल्वेरुळाची दुरुस्ती होण्याची शक्यता आहे. तसेच या मार्गावरील 90 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 46 रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे. रेल्वेरुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. या कामासाठी 1 हजार पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. भारतीय रेल्वेने याप्रकरणी ट्विट करत या कामाची माहिती दिली आहे. ट्विटनुसार, रेल्वेरुळाच्या दुरुस्तीचे काम आणि रेल्वेचे अवशेष दूर करण्यासाठी 7 पेक्षा जास्त पोक्लेन्स, 5 जेसीबी, दोन अपघात बचाव रेल्वे आणि मोठे क्रेन कामाला लागले आहेत.
2 हजार पेक्षा जास्त प्रवाशी करत होते प्रवास : तिहेरी रेल्वे अपघातात हजारापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. तर 288 जण ठार झाले आहेत. जखमींना बालासोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झालेल्या कोरोमंडल आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रेल्वेमध्ये 2 हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. जखमी प्रवाशांपैकी 790 हून जास्त प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
विरोधकांच्या मागणीवर रेल्वेमंत्र्यांनी फटकारले : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दु:खाच्या काळात लोकांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, एका मोठ्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य आणि दुरुस्तीचे कामे सुरू असताना 'राजकारण' करण्याची ही वेळ नाही. दरम्यान केंद्र सरकारने या भीषण अपघातातील दोषींना कठोर शिक्षा करण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे म्हटले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त केला. या दुर्घटनेला मानवी चूक किंवा तांत्रिक बिघाड कारणीभूत आहे का, याची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.
हेही वाचा -