नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाबाबत टुलकिट पसरवल्याप्रकरणी २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी या तरुणीला अटक करण्यात आली आहे. त्यावरून स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिने मौन सोडले आहे. दिशा रवीला पाठिंबा देणारे ट्विट तिने केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या हक्काबाबत तडजोड होऊ शकत नाही, असे तिने म्हटले आहे.
काय आहे ट्विट?
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण मार्गाने एकत्र येणे हे तडजोड न होण्यासारखे मानवी हक्क आहेत. हे हक्क कोणत्याही लोकशाही देशाचे मुख्य भाग हवेत. #StandWithDishaRavi, असे ट्विट ग्रेटा थुनबर्ग हिने केले आहे.
दिशा रवीला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी -
पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दिशा रवीला शुक्रवारी पटियाला हाऊस न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिला तीन दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली. १३ फेब्रुवारीला दिशा रवीला बंगळुरूतून अटक करण्यात आली होती. शेतकरी आंदोलनाबाबत माहिती परसवणारे टुलकिट तयार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोध गुन्हा दाखल केला होता. मात्र, नंतर तिघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
मुंबईतील अॅड. निकिता जेकब आणि बीडमधील शंतनू मूळुक या दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. टुलकिट परवल्याचा आणि त्यात दुरुस्ती केल्याचा आरोप दोघांवर ठेवण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. निकिता जेकब यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तर मूळुक याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यालाही अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.