नवी दिल्ली - पतियाला हाऊस न्यायालयाने पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसाने दिशा रवीला आणखी पाच दिवसांची कोठडी मिळावी, अशी न्यायालयाकडे विनंती केली होती. शेतकरी आंदोलनात टुलकिट प्रकरण दिशा रवी ही दिल्ली पोलिसांच्या अटकेत आहे.
दिशाची सहकारी असलेली मुंबईतील वकील निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांचीही 22 फेब्रुवारीला चौकशी होणार आहे. दिशाच्या समक्ष त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याने तिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात होती.
हेही वाचा-शेतकरी आंदोलन टुलकिट प्रकरण : दिशा रवीला पुन्हा तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी
दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून अटक केली होती. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेले वादग्रस्त टुलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गने हेच टुलकिट दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र नंतर ते ट्विट डिलीट केले. नंतर तिने तिच्या सोशल मीडियावर आणखी एक अपडेटेड डॉक्युमेंट शेअर केले. या कृतीला पोलिसांनी याप्रकरणी खलिस्तान समर्थक संबोधलं होतं.
दिशा रवी "टूलकिट गुगल डॉक"ची संपादक आहे. तिने कागदपत्र तयार करणे आणि प्रसारित करणे यात मुख्य भूमिका निभावल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. तसेच दिशाची सहकारी असलेली मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्या विरोधात दिल्लीत अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. दिशा रवीशी संबंधित शांतनू नावाचा व्यक्तीही पोलिसांच्या रडावर आहे.
टूलकिट काय आहे?
हेही वाचा-दिशा रवीच्या अटकेप्रकरणी दिल्ली महिला आयोगाची पोलिसांना नोटीस
टूलकिट हे एक डॉक्युमेंट असून त्याचा वापर एखादी मोहीम टिकवून ठेवण्यासाठी होतो. मोहिमेसाठी कृती करण्याच्या योजनेचाही यात समावेश असतो. आंदोलन अधिक व्यापक व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून या टुलकिटचा वापर केला जातो. एखादी समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवल्यास त्यासंबंधी व्यावहारिक सल्ला आणि मार्गदर्शन प्रदान करण्याच्या दस्तावेजांना टूलकिट म्हटले जाते.
बीडमधील आरोपीला १६ फेब्रुवारीला जामीन मंजूर
टुलकिट प्रकरणातील संशयित आरोपी शंतनू मूळूक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दहा दिवसांचा अटकपूर्व जामीन 16 फेब्रुवारीला मंजूर करण्यात आला आहे. पुढील दहा दिवसांमध्ये दिल्लीमध्ये जाऊन शंतनू यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
टुलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केला गुन्हा
टुलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात कलम 120 ब आणि 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना बीड येथील शंतनू मुळूक यांचे नाव समोर आले. शंतनू यांचे नाव या प्रकरणात आल्याने, दिल्ली पोलिसांनी बीडमध्ये जाऊन शंतनू यांच्या घराची झडती घेतली होती. अटकेची शक्यता असल्याने शंतनू यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन, अटकपूर्व (एन्ट्रीसिपेट्री) ट्रान्झिट बेलसाठी अर्ज केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने शंतनू यांना दहा दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती शंतनू यांचे वकील सतेज जाधव यांनी दिली आहे.
मुंबईमधील निकिता जेकबला १७ फेब्रुवारीला जामीन मंजूर
प्रजासत्ताक दिनाआधी झूम अॅपद्वारे 'पोएटिक जस्टीस फाऊंडेशन'च्या बैठकीला हजेरी लावल्याची कबुली निकिता जेकब यांनी दिली आहे. या बैठकीला खलिस्तानी समजल्या जाणाऱ्या पोएटिक जस्टीस फाऊंडेशन या संघटनेचे संस्थापक धालिवाल यांचीही उपस्थिती होती. ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडून अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. या विरोधात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून निकिता जेकबने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार निकिताला 3 आठवड्यांचा अटकपूर्व जामीन 17 फेब्रुवारीला मंजूर झाला आहे.