बेंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव प्रति किलो 130 ते 150 रुपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे आता टोमॅटो चोरीच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. कर्नाटकातील बेंगळुरू येथे एक ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे तीन जणांनी टोमॅटोने भरलेला पिकअप ट्रक जबरदस्तीने ताब्यात घेतला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी ड्रायव्हरवर त्यांच्या वाहनाला धडक दिल्याचा खोटा आरोप केला होता.
250 किलो टोमॅटो पळवून नेले : ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर बेंगळुरूमधील आरएमसी यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी चित्रदुर्गातील हिरीयुर येथील एक शेतकरी 250 किलो टोमॅटो पिकअप ट्रकमध्ये भरून कोलारच्या दिशेने घेऊन जात होता. आरएमसीजवळ पिकअप ट्रकने त्यांच्या कारला धडक दिल्याचे सांगून कारमधील तीन आरोपींनी वाहन थांबवले.
आरोपींनी चालकाला मारहाण केली : त्यानंतर आरोपींनी चालकाला मारहाण केली आणि गोंधळ घातला. आरोपींनी वाहनात बसलेल्या शेतकऱ्यावरही हल्ला केल्याचे पीडिताने पोलिसांना सांगितले. आरोपीने नुकसानीची मागणी करून मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र गाडीत टोमॅटो पाहून जबरदस्तीने गाडी पळवण्याचा बेत आखला. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी चालक आणि शेतकऱ्याला बेंगळुरूमधील चिक्काजालाजवळ सोडून टोमॅटोने भरलेले वाहन घेऊन पळ काढला.
टोमॅटो चोरीच्या घटना वाढल्या : या घटनेप्रकरणी आरएमसी यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. नुकतेच हसन जिल्ह्यातील एका शेतातून 2.5 लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले होते. बेलूर तालुक्यातील गोणी सोमनहळ्ळी येथे टोमॅटोची चोरी झाली आहे. शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या 2 एकर शेतात पिकवलेला भाजीपाला चोरट्यांनी एका रात्रीत चोरून नेला.
हेही वाचा :