चेन्नई ( तमिळनाडू ) - मुलाने गावातीलच एका मुलीला पळवून नेल्याने मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या ४३ वर्षीय आईला बेदम मारहाण केली ( Woman Tied to Lamppost Beaten up ) आहे. ही घटना तमिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात मंगळवारी ( दि. २५ जानेवारी ) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीच्या आईसह १४ जणांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेन्नईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मीनाक्षीचा मुलगा शक्तीशिवा (वय २४ वर्षे) याचे त्याच्याच गावातील सुधा यांची मुलगी भुवनेश्वरी ( वय १९ वर्षे ) हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही २२ जानेवारीला गावातून सैराट झाले. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच २५ जानेवारीला भुवनेश्वरीची आई सुधा व इतर नातेवाईकांनी शक्तीशिवाच्या आईला घरातून बाहेर ओढत आणले. त्यानंतर त्यांनी वीजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच परलाची येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मीनाक्षी यांना अरुप्पूकोट्टाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मीनाक्षी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुधा व इतर १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मीनाक्षी यांच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करा, या मागणीसाठी पोलीस ठाण्यात समोर आंदोलन केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर हे मीनाक्षीच्या नातेवाईकांनी आंदोलन थांबवले.