कोलकाता - पश्चिम बंगाल राज्यात येत्या एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, अनेक वेळा राजकीय दौरे, यात्रा आणि सभांना हिंसक वळण लागल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नॉर्थ २४ परगाणा जिल्ह्यात भाजपाने काढलेल्या परिवर्तन यात्रेवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॉम्ब फेकले. जिल्ह्यातील बशिरहाट परिसरात ही घटना घडली यावेळी कार्यकर्त्यांनी परिवर्तन यात्रेवर हल्ला देखील केल्याचा आरोप होत आहे.
भीती निर्माण करण्यासाठी नियोजित हल्ला - भाजपा
तृणमूलच्या नेत्यांनी यात्रेदरम्यान आमच्यावर हल्ला केला. यात एका भाजपाच्या कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली, असे स्थानिक भाजप नेत्याने सांगितले. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी नियोजितपणे हल्ला करण्यात आला, असे पश्चिम बंगाल भाजपाचे प्रमुख दिलीप घोष यांनी सांगितले. बशिरहाट येथील मिनाखा येथे भाजपाने आयोजित केलेल्या परिवर्तन यात्रेवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. हल्लाकरून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. पश्चिम बंगालची जनता योग्य पक्षाला सत्तेत आणेल, असे घोष म्हणाले.
दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मनिखा येथील तृणमूलच्या कार्यालयाची तोडफोड केली. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. २९४ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी मोठी राजकीय चुरस सुरू झाली आहे.