चिनसुरा : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या ( Bharatiya Janata Party ) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असतात. आता चिनसुरा येथील एक अशीच घटना समोर आली आहे. चिनसुरा येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार असीत मजुमदार ( Trinamool Congress MLA Asit Majumdar ) यांनी शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. शुक्रवारी संध्याकाळी येथे एका रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अवघ्या काही मिनिटांत व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मजुमदार काठीने मारहाण करत आहेत.
भाजप कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीमुळे चिनसुरा येथील खडीना मोरे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सत्ताधारी पक्षावर नेटिझन्सनी हल्लाबोल केला आहे.
आमदार असित मजुमदार यांच्यासोबत टीएमसी कार्यकर्त्यांच्या गटाने भाजपच्या मिरवणुकीवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तृणमूल पक्ष कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पक्ष कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर लगेचच नेत्याने तृणमूल कार्यकर्त्यांना भाजपा कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्याचे आदेश दिले, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष तुषार मजुमदार यांनी केला. “तृणमूलने मुद्दाम आज शांततापूर्ण मिरवणुकीवर हल्ला केला आणि स्वतः आमदारांनी काही लोकांना काठीने मारहाण केली,” मजुमदार म्हणाले.
तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांचे याउलट म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या स्थायी समितीच्या बैठकीतून परतत असताना त्यांची गाडी अडवून त्यांना त्रास दिल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Interview With Prithviraj Chavan: देशात मोदी सरकारची दडपशाही, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप; पाहा खास मुलाखत