कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप तृणमूलच्या एका नेत्याने केला आहे. मदन मित्रा यांनी आरएसएसचे नाव न घेता त्यावर टीका केली. हा ममतांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
..तर बंगालमध्ये गोध्रा झाले असते
मित्रा म्हणाले, "ज्याप्रकारे हा हल्ला करण्यात आला, त्यावरुन तो प्रशिक्षित व्यक्तींकडून करण्यात आला असल्याचे वाटत आहे. 'निक्करमध्ये' प्रशिक्षण घेणाऱ्या काही लोकांकडून हा हल्ला केला गेला असावा." "याप्रकरची घटना जर गुजरातसारख्या एखाद्या राज्यात झाली असती, तर त्याठिकाणी गोध्रा हत्याकांडाप्रकारे आणखी एक घटना घडली असती. मात्र, पश्चिम बंगालच्या लोकांना गोध्रा नाही, तर शांती हवी आहे" असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी मित्रा यांनी हा हल्ला साधासुधा नसून, ममतांच्या हत्येचा हा कट असल्याचे मत मित्रा यांनी यावेळी व्यक्त केले.
बुधवारी नंदीग्राममध्ये प्रचारासाठी आलेल्या ममतांना काही लोकांनी धक्का दिल्यामुळे त्या पडल्या. यामुळे त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली. ममतांनी हा आपल्यावरील हल्ला असल्याचा आरोप केला आहे, तर भाजपाने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सध्या कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : ममतांवरील हल्ला प्रकरण : तृणमूल आणि भाजपाच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट