अमरावती : आंध्र प्रदेशमध्ये मद्याच्या किंमती वाढल्यामुळे तळीरामांनी एक वेगळाच पर्याय निवडला आहे. आपली तल्लफ भागवण्यासाठी ते दारुऐवजी पर्यायाने स्वस्त असणाऱ्या मिथिल-अल्कोहोलच्या सॅनिटायझर्सचा वापर करत आहेत. मात्र, विजयवाडामध्ये अशाच प्रकारे सॅनिटायझर पिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
यापूर्वीही झाला होता दोघांचा मृत्यू..
यानंतर राज्यातील पोलिसांनी सर्व मेडिकल दुकानदारांना सॅनिटायझर विकण्याबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्टापेटा राजू गारु स्ट्रीटवर राहणारा श्रीराम नागेश्वर राव याचा सॅनिटायझर पिल्यामुळे मृत्यू झाला. तर दुसरीकडे विंचिपेटामध्ये राहणाऱ्या थोटाकुरा भाग्यराजूने सॅनिटायझर पिल्यानंतर लटकवून घेत आत्महत्या केली. थोड्याच दिवसांपूर्वी आणखी दोघांचा अशा प्रकारे सॅनिटायझर पिल्यामुळे मृत्यू झाला होता.
दारुला पर्याय सॅनिटायझर..
सध्या कोरोना महामारीमुळे सॅनिटायझर अगदी सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यातच दारुच्या किंमती वाढल्यामुळे तळीराम दुसऱ्या स्वस्त पर्यायांचा विचार करत आहेत. मात्र, सॅनिटायझर प्राशन केल्यामुळे उलट्या आणि जुलाबाची लागण होते. तसेच, अधिक प्रमाणात सॅनिटायझरचे प्राशन केल्यास गंभीर आजार किंवा मृत्यूही होऊ शकतो.
हेही वाचा : 'पॉर्न' पाहिल्यामुळे जिवाजी विद्यापीठाच्या आठ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; ग्वाल्हेरमधील प्रकार