लखनौ - उत्तर प्रदेश पोलिसांनी अलकायदाच्या आणखी तीन दहशतवाद्यांना अटक केल्याचा दावा करण्यात येत आहे. रिपोर्टनुसार लखनौमधील वझीरगंज येथील शकील, मुझफ्फरनगरमधील मोहम्मद मुस्तक्वीम आणि लखनौमधील न्यू हैदरगंज येथील मोहम्मद मोईद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मिन्हाझ अहमद आणि मुशीरुद्दीन या आरोपींना रविवारी अटक केली आहे. हे अटकेतील दहशतवादी उत्तर प्रदेशमधील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा प्लॅन आखत होते, असा एटीएसने दावा केला आहे. मुस्तक्वीम याला कटाची माहिती होती. त्याने मिन्हाझ आणि मुशीरुद्दीनला मदत केली आहे. मोईदने मिन्हाजच्या मदतीने मुस्तक्वीला पिस्तूल उपलब्ध करून दिले. शकीलने मिन्हाझला शस्त्रे मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेतील तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हेही वाचा-पीयूष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृहनेते पदी निवड
सुत्राच्या माहितीनुसार कानपूरमधील अभियांत्रिकीचे आठ विद्यार्थी आणि तीन महिला या दहशवाद्यांच्या संपर्कात होते. एटीएसने रविवारी अटकेतील आरोपींकडून दोन प्रेशर कुकर बॉम्ब, सेमी मॅन्युफॅक्चुअर्ड टाईम बॉम्ब आणि सहा ते सात किलोची स्फोटके जप्त केली आहेत.