दुर्गापूर : पश्चिम बंगालमधील पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील दुर्गापूर येथील कारखान्यात गॅस गळती होऊन दुर्गापूर स्टील प्लांटमधील ( Durgapur Steel Plant ) तीन कंत्राटी कामगारांचा शुक्रवारी दुपारी मृत्यू ( 3 Died In Durgapur Gas Leak ) झाला. अन्य पाच कंत्राटी कामगारांवर दुर्गापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
सजल चौहान, सिंटू यादव आणि संतोष चौहान अशी तीन मृत कामगारांची नावे आहेत. या घटनेनंतर प्लांटमधील उर्वरित कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या अपघातासाठी ते प्लांट अधिकाऱ्यांना जबाबदार धरत आहेत.
वारंवार होतेय गॅस गळती
प्लांटमध्ये वारंवार गॅस गळतीच्या घटना का घडल्या, असा प्रश्न कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे. तीन ताज्या मृत्यूंसह, गेल्या पाच वर्षांत प्लांटमधील गॅस गळतीमुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या नऊ झाली आहे.
कामगारांना प्रशिक्षण नाही
गेल्या अनेक वर्षांपासून प्लांटमध्ये आधुनिकीकरणाचे कोणतेही काम झाले नसून या दुर्लक्षाचा फटका कामगारांना बसत असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. नियुक्तीच्या वेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे पुरेसे प्रशिक्षण दिले जात नसल्याचा आरोपही युनियनने केला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संलग्न असलेले ट्रेड युनियन नेते शेख सहाबुद्दीन यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.