हैदराबाद Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२६ नोव्हेंबर) येथून ५० किमी अंतरावर असलेल्या 'कान्हा शांती वनम' येथे एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी बोलताना, भारत हा स्वत:ला जगाचा मित्र मानत असल्याचं ते म्हणाले. २०२० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कान्हा शांती वनमचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
पद्म पुरस्कार स्वतः सन्मानित होतात : पंतप्रधान मोदी म्हणाले की, "अध्यात्मिक नेते कमलेश जी यांनी मानवतेसाठी केलेलं काम आश्चर्यकारक आहे. त्यांच्या योगदानाचा पद्म पुरस्कारानं सन्मान करण्याचा बहुमान आमच्या सरकारला मिळाला. आजकाल आम्ही पद्म पुरस्कार देताना अशी परंपरा बनवली आहे की, यामुळे पुरस्कार स्वतः सन्मानित होतात", असं मोदी म्हणाले.
भारत जुन्या परंपरा पुन्हा स्वीकारत आहे : भारत आता आपल्या जुन्या परंपरा पुन्हा स्वीकारत आहे, असंही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या परंपरेनुसार आम्ही जगाला मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतो. हे भविष्यातही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले. "समृद्धी केवळ पैशानं येत नाही तर ती सांस्कृतिक मूल्यांच्या बळावर येते. आज भारत आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर अनेक क्षेत्रात खूप प्रगती करत आहे. देश नव्या युगात प्रवेश करत आहे", असं त्यांनी नमूद केलं.
भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्णकाळ : पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "ज्यांनी भारताला गुलाम बनवलं त्यांनी आमच्या ज्ञान, ध्यान, योग, आयुर्वेद या खऱ्या शक्तींवर हल्ला केला. त्यामुळे देशाला खूप त्रास सहन करावा लागला. पण आता काळ बदलत आहे आणि भारतही बदलतोय. भारताच्या स्वातंत्र्याचा हा सुवर्णकाळ आहे", असं त्यांनी सांगितलं. "आपण जे काही काम करू, ते येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य ठरवेल", असं ते म्हणाले.
सरकार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे : "विकसित भारत सुनिश्चित करण्यासाठी आपण महिला शक्ती, युवा शक्ती, कामगार शक्ती आणि उद्यम शक्ती या चार स्तंभांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे", असं मोदी म्हणाले. "गरीब, मच्छिमार, शेतकरी, विद्यार्थी, तरुण यांचं सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पूर्वी लोकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयात जावं लागत होतं, परंतु आज सरकार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे", असं मोदी म्हणाले.
हेही वाचा :