गुवाहाटी - आसाम विधानसभा निवडणुकीच्या तिसर्या आणि अंतिम टप्प्यात आज मतदान होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अनुक्रमे 47 आणि 39 जागांवर मतदान झाले. शेवटच्या टप्प्यातील उर्वरित 40 जागांसाठी मतदान होणार आहे.
आसाममध्ये तिसर्या आणि अंतिम टप्प्यात 40 जागांवर आज मतदान होणार आहे. त्यापैकी 2 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 6 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तिसर्या टप्प्यात एकूण 337 उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या टप्प्यात 79,19,641 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यात 40 लाखाहून अधिक पुरुष आणि 39 लाख महिला मतदार आहेत. यावेळी 139 तृतीय लिंग मतदारही मतदान करतील. या 40 विधानसभा मतदारसंघात एकूण 11,401 मतदान केंद्रे उभारली गेली आहेत.
कोणाचे किती उमेदवार रिंगणात ?
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए आणि काँग्रेस प्रणीत महाज्योत या पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. काँग्रेस 24, असम जातीय परिषद 22, भाजपा 20, जेडीयू 19, एजीपी 13, एआययूडीएफ 12, आरपीआय (ए) 11, व्होटर्स पार्टी इंटरनेशनल 11, तृणमूल काँग्रेसने 10 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. याखेरीज अन्य 20 राजकीय पक्षांनीही वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या टप्प्यात 25 महिला उमेदवारही रिंगणात आहेत. त्यापैकी भाजपा 2, काँग्रेस 3, एजेपी 2, एआययूडीएफ 1, एजीपी 1 आणि अन्य पक्षांनी 9 महिलांना रिंगणात उतरवलं आहे. अपक्षाकडून 7 महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपासमोर सत्ता राखण्याचे आव्हान -
काँग्रेस राज्यात कमी पडली असली तरी भाजपाला यावेळी सत्ता मिळवणे कठिण असल्याच चित्र आहे. आसाममध्ये धार्मिक बहुलता आहे. एनआरसी आणि सीएए कायद्यांमुळे भाजपाच्या पुढे एक आव्हान निर्माण झाले आहे. या कायद्यांविरोधात आसाममध्ये मोठे आंदोलन झाले होते. मात्र, सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने जोरदार प्रचार केला.
2016 विधानसभा निवडणूक -
काँग्रेसने 26, भाजपा 60, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट (एआईयूडीएफ) 13, निर्दलीय 1, आसाम गण परिषद (एजीपी) 14, बोडोलँड पिपल्स फ्रंट (बीओपीएफ) 12 जागांवर विजय मिळवला होता. आसामध्ये 15 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. भाजपा 2016 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच आसाममध्ये सत्तेवर आले आहे. 2016 च्या निवडणुकीमध्ये आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपा, आसाम गण परिषद, बोडोलँड पिपल्स फ्रंट पक्षाचा समावेश होता. तर संयुक्त पुरोगामी आघाडीत काँग्रेस, युनायटेड पिपल्स पार्टी, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश होता.
सध्याची परिस्थिती -
भाजपा आसाममध्ये आसाम गण परिषद, यूनायटेड पिपल्स पार्टी लिबरल सोबत निवडणूक लढवत आहे. राज्यात भाजपचे सरकार असून मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे मुख्यमंत्री आहेत. आसाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मे 2021 रोजी संपणार आहे. आसाममध्ये काँग्रेसने अनेक लहान पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी केली आहे. त्यामध्ये एआययूडीएफ, बीपीएफ, माकपा, भाकपा आणि आंचलिक गण मोर्चा सामिल आहे. 126 विधानसभा जागांपैकी भाजपा 92 जागांवर लढत आहे. तर एजीपीला 26 आणि यूनायटेड पिपल्स पार्टी लिबरलला 8 जागा भाजपाने दिल्या आहेत. काँग्रेस 90 जागांवर लढत आहे. तर उर्वरित 36 जागांवर आघाडीतील पक्ष लढत आहेत. 2016 च्या निवडणुकीमध्ये बोडोलँड पिपल्स फ्रंट (बीओपीएफ) पक्षाने भाजपासोबत युती केली होती. मात्र, या निवडणुकीत हा पक्ष काँग्रेसच्या महाआघाडीत सामील झाला आहे.
हेही वाचा - 'महाविकास आघाडीचे नाही, तर महावसुलीचे सरकार' रविशंकर प्रसाद यांची टीका