कानपूर देहात (उत्तरप्रदेश ) : येथील ( Kanpur Dehat Uttar Pradesh ) जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीशांनी खून खटला लढणाऱ्या वकिलासह सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ( Life Imprisonment To Lawyer ) सुनावली. खटला लढणाऱ्या वकिलाला शिक्षा झाल्याची घटना येथे प्रथमच घडली असावी. एवढेच नाही तर न्यायालयाने 11.32 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हे प्रकरण 2009 मध्ये झालेल्या हत्येचे आहे.
अशी आहे घटना : 18 जुलै 2009 रोजी शांतीदेवीच्या घरात घुसून किशोरीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर गावातील गुंडांनी तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीची तक्रार दाखल करण्यासाठी कुटुंबीय पोलीस ठाण्यात जात असताना वाटेत वकील राघवेंद्र सिंग उर्फ रामू, हरिराम, रामदयाल, धर्मेंद्र उर्फ पप्पू, राजू, रामू उर्फ रामेंद्र, सलीम उर्फ गब्बर यांनी त्यांना घेरले. त्यांच्यावर लाठ्या-कुऱ्हाड, बंदुकीने हल्ला केला. यावेळी गोळी लागल्याने शांतीदेवी यांच्या कुटुंबातील गंगाचरण यांचा जागीच मृत्यू झाला. तर शांतीदेवीसह तीन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
११.३२ लाखांचा दंड : कानपूर देहात येथील जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार झा यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अधिवक्ता राघवेंद्र सिंह हे खटला लढत होते. सीबीसीआयडी गणेश कुमार दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिलासह सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने 11.32 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी तीन वर्षांचा कारावास भोगावा लागेल.