नवी दिल्ली : शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चेची आठवी फेरीही संपली असून, ही चर्चाही निष्फळ ठरली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची तयारी न दर्शवल्यामुळे या बैठकीतूनही काहीही तोडगा निघाला नाही. यानंतर आता १५ जानेवारीला पुढील चर्चेची फेरी पार पडणार आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुमारे दीड महिन्यापासून देशभरात आंदोलन सुरू आहे. केंद्राने हे कायदे मागे घ्यावेत, आणि हमीभाव लागू करावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत केंद्र सरकारसोबत याबाबत चर्चेच्या आठ फेऱ्या पार पडल्या असून, सरकारने कायदे मागे घेण्याची तयारी दर्शवली नाही. त्यामुळे, हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनासाठी देशातील ४० प्रमुख शेतकरी संघटना, आणि इतर ५०० संघटनांचे हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर बसून आहेत.
२६ जानेवारीला किसान ट्रॅक्टर परेड..
२६ जानेवारीपर्यंत हे आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर परेड आयोजित करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजपथावरही ट्रॅक्टर परेड नेण्यात येईल. या परेडला 'किसान परेड' असे नाव देण्यात आले आहे. गुरुवारी कित्येक ठिकाणी या परेडचा सरावही करण्यात आला होता. महिलांनीही मोठ्या प्रमाणात या सरावात सहभाग नोंदवला.
हेही वाचा : बदायूं बलात्कार प्रकरण : चंद्रमुखी देवींच्या वक्तव्यावर प्रियांका गांधी भडकल्या