रायपूर : सध्या छत्तीसगडमधील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पाच मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. यामुळेच कित्येक समारंभांवर विशेषतः लग्नावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. लग्नाला उपस्थित असणाऱ्या वऱ्हाडींची संख्या निश्चित केल्यामुळे बलरामपूर जिल्ह्यात एक असा प्रकार समोर आला, जे पाहून पोलिसांनीही डोक्याला हात लावला.
झारखंडच्या एका मुलाचे छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये लग्न होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध पाहता लग्नाला जास्त लोक घेऊन जाणे शक्य नव्हते. मात्र, लग्न तर करायचे आहेच! त्यामुळे हा उतावळा नवरा चक्क दुचाकीवर एकटाच आपल्या लग्नासाठी निघाला. विशेष म्हणजे हा आपल्या लग्नातील शेरवानी घालूनच घरातून बाहेर पडला. फक्त, मुंडावळ्यांऐवजी त्याने हेल्मेट घातले हे नशीब!
पोलीस म्हणाले परवानगी देतो, पण चार-पाच लोक तरी बोलव..
झारखंड-छत्तीसगड सीमेवर जेव्हा पोलिसांनी त्याला तशा अवतारात येताना पाहिले, तेव्हा तेदेखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी अडवल्यानंतर युवकाने सांगितले की आपण आपल्या लग्नाला चाललोय. बिचारा एकटाच आपल्या लग्नाला चालल्याचे बघून पोलिसही त्याला म्हणले, की आम्ही परवानगी देतो पण पाच लोकांना तरी बोलाव. मात्र, तरीही या नवरोबाने एकटेच जाणे पसंद केले.
दरम्यान, या युवकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हेही वाचा : ऑक्सिजन पुरवठ्यात कोणी अडथळा आणत असेल तर फासावर लटकवा-दिल्ली उच्च न्यायालय