कुपवाडा : जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका कारवाईमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार कुपवाडा पोलीस, २८ आरआर आणि १६२ केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) या दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अब राशद लोन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाकडून तीन ग्रेनेड, आणि एके-४७ बंदुकीची ५८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
एएनईच्या हालचालीबाबत आम्हाला काही गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर तीन दलांच्या पथकांनी वाणी दोरुस्सा आणि सोगम भागामध्ये चेकनाका उभारण्यात आला. या चेकनाक्यावर सुरू असलेल्या तपासणीदरम्यान एका व्यक्तीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, आम्हाला त्याच्याकडून शस्त्रसाठा मिळाला अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : कर्नाटकचे माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे कोरोनाने निधन