अहमदाबाद : यापूर्वी हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळ १८ तारखेला गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, या वादळाने अचानक आपला वेग आणि दिशा बदलल्यामुळे आता आज सायंकाळपर्यंतच हे वादळ गुजरातच्या समुद्री हद्दीत पोहोचण्याची शक्यता दिसून येत आहे. मंगळवापर्यंत हे वादळ गुजरातच्या हद्दीतून पुढे जाईल. या पार्श्वभूमीवर राज्याच्या किनारी भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची ५४ पथके तैनात करण्यात आली आहेत.
आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू..
अद्याप तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या समुद्री हद्दीत पोहोचले नसूनही, यामुळे होणाऱ्या पावसाने आठ लोकांचा बळी घेतला आहे. या वादळाची तीव्रता सध्या वाढली आहे. त्यामुळे समुद्रातील सर्व जहाजांना किनाऱ्यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जनरेटर वा इन्व्हर्टरची सोय करुन ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात..
पुढील २४ तासांमध्ये या वादळाची तीव्रता आणखी वाढू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या ५४ पथकांना तैनात करण्यात आले आहे.
सूरतमधील ओलपाडमध्ये वडोदऱ्याहून एनडीआरएफची सहा पथके पोहोचली आहेत. तालुक्यातील २८ गावांना अलर्ट देण्यात आला असून, मच्छिमारांना समुद्रातून बाहेर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, आणंदच्या खंभातमध्ये पुण्याहून दोन एनडीआरएफ पथकांना पाचारण करण्यात आले आहे. यापैकी एक पथक रालज, तर दुसरे धुवारणात तैनात करण्यात आले आहे.
सूरत विमानतळ बंद..
हवामानातील बिघाडामुळे खबरदारी म्हणून सूरत विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
हजारो लोकांचे स्थलांतर..
कच्छमधील कंडला बंदर रिकामे करण्यात आले असून, याठिकाणी असलेल्या चार हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच, परिसरात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दुसरीकडे जामकंडोरणा तालुक्यातील १३ कुटुंबांमधील ६५ जणांना एका शाळेत आसरा देण्यात आला आहे. तर, जामनगरमधील २,२४३ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणचे ९९८ धोकादायक होर्डिंग्जही काढण्यात आले आहेत.