नवी दिल्ली - दिल्लीतील शेतकरी आंदोलनात हिंसाचार घडवून आणण्याचा कट आखला जात असल्याची माहिती एका संशयीत तरुणाने दिली होती. मात्र, आता या तरुणाने आपला जबाब फिरवला आहे. शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली आणि सिंघू सीमेवर हिंसाचार घडवून आणण्याबरोबरच चार नेत्यांची हत्या करण्याची सुपारी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप या तरूणाने केला होता.
सिंघू सीमेवरील आंदोलनस्थळावरून शेतकऱ्यांनी योगेश नामक संशयीत तरुणाला ताब्यात घेतले होते. माध्यमांपुढे येत या तरुणाने आंदोलनात हिंसाचाराचा कट आखण्यात येत असल्याची माहिती दिली होती. या संशयीताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. योगेश असे या तरुणाचे नाव आहे.
जबरदस्तीने बोलायला लावले -
बळजबरीने माझ्याकडून सर्वकाही बोलून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. जर मी आरोप मान्य केले नाही तर मारण्याची धमकी दिली. मात्र, जर माध्यमांपुढे सांगितल्यावर तुला सोडून देण्यात येईल, असे या संशयीताने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलीस सत्यता पडताळून पाहत असून तरूणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
संशयीताने काय सांगितले होते पत्रकार परिषदेत -
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकरी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. या रॅलीत हिंसाचार घडवून आणण्याचा कट आखला जात असल्याची माहिती तरुणाने दिली. यासाठी सुमारे ५० ते ६० हल्लेखोरांना तयार ठेवण्यात आले आहे. यातील काही पोलिसांच्या वर्दीत असतील. त्यांच्या पायात बूट असतील, असे वर्णन संशयीत तरुणाने केले.
आंदोलकांवर गोळीबार करण्याचा कट आखला जात आहे. दिल्लीत येण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी गोळीबार केला जाईल. आंदोलकांमध्ये पोलिसांच्या वर्दीत हल्लेखोरही असतील. पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट या संशयीताने उघड केला आहे. पोलिसांनी नंतर या संशयीताला ताब्यात घेतले आहे.