नवी दिल्ली - निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांचा कार्यकाळ सोमवारी संपला. घटनेच्या कलम 324 च्या कलम (दोन) नुसार राष्ट्रपतींनी श्री. सुशील चंद्रा यांची 13 एप्रिल, 2021 पासून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
चंद्रा यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सुशील चंद्रा हे 14 मे 2022 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळतील. चंद्रा यांच्या नेतृत्वात गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशात निवडणूक विधानसभा निवडणुका पार पडतील. गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब विधानसभेची मुदत पुढील वर्षी वेगवेगळ्या तारखेला संपणार आहे.
कोण आहेत सुशील चंद्रा?
चंद्रा यांचा जन्म 15 मे 1957 चा असून रुरकी विद्यापीठ तसेच डेहराडून येथील डी.ए.व्ही. महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. ते 1980 च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेतील (आय.आर.एस.) अधिकारी आहेत. त्यांनी आय.आर.एस. सेवेदरम्यान उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली आणि गुजरात आदी राज्यामध्ये काम केले आहे. मुंबई येथे अन्वेषण विभागाचे संचालक आणि गुजरातचे अन्वेषण महासंचालकाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच सिंगापूर, आयआयएम बेंगळुरू आदी ठिकाणी विविध प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.
हेही वाचा - कुरानमधील 26 आयत हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली