नवी दिल्ली Sports Minister Cancel China Visit : चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीननं अरुणाचल प्रदेशाच्या खेळाडूंना व्हिसा दिलेला नाही. याच्या विरोधात भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला चीन दौरा रद्द केलाय. चीनच्या कुरापती यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. (Arunachal Pradesh players denied visas by China)
चीनचं कृत्य खेळ भावनेच्या विरोधात : अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो नेहमीच तसाच राहील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलंय. चीननं जातीय किंवा भौगोलिक आधारावर केलेल्या कोणत्याही भेदभावाला भारत विरोध करतो. यावरही भारतानं चीनला तीव्र विरोध दर्शवलाय. चीनचं हे कृत्य आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भावनेवर खोलवर आघात करणारं आहे. खेळांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, हा स्पर्धेच्या मार्गदर्शक तत्त्वाचा एक भाग आहे. हे कृत्य क्रीडा भावना आणि त्याच्या आचरणाचं थेट उल्लंघन करणारं असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. चीनी अधिकाऱ्यांनी याद्वारे निवडक भारतीय खेळाडूंना लक्ष्य केल्याचं भारत सरकारला कळलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
भारताला निर्णय घेण्याचा अधिकार : भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमात भारताचं प्रतिनिधित्व करणार होते. यावर माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, भारताला आपल्या हिताचं रक्षण करताना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. चीनमधील हांगझोऊ येथे 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना त्यात सहभागी व्हायचं होतं, परंतु चीननं आपलं कुटील धोरण अवलंबलं आणि या खेळाडूंना व्हिसा दिला नाही.
हेही वाचा :