बारामती (पुणे) - अष्टविनायक मंदिरांपैकी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असणाऱ्या मोरगाव स्थित मयुरेश्वर मंदिराचा प्रथम मान आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मयुरेश्वराचे मंदिर बंद आहे. गणेश उत्सवासह इतर दिवशीही भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणारे मंदिर व परिसरात सध्या शुकशुकाट पहावयास मिळत आहे. मोठ्या भक्तिभावाने अष्टविनायक दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शन घेऊन परतावे लागत आहे. असे असले तरी मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी काही प्रमाणात भाविक येत असल्याचे दिसून येत आहे.
मयुरेश्वराचे मंदिर 'स्वनंदा' नावानेही ओळखले जाते -
पुण्यापासून ५५ किलोमीटरवर असलेले हे मयुरेश्वर मंदिर कऱ्हा नदीच्या काठावर वसले आहे. मयुरेश्वर मंदिराला ४ प्रवेशद्वार आहेत. या प्रत्येक प्रवेशद्वारावर त्या त्या कालखंडातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहेत. अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असणारे हे मंदिर उत्तराभिमुख आहे. या मंदिराला सुमारे ५० फूट उंचीची तटबंदी आहे. मंदिर परिसरात २ उंच अशा दीपमाळा आहेत. तसेच भाविकांनी मंदिरात प्रवेश करताच प्रथम त्यांना ६ फूट उंच असणारा दगडी उंदीर व गणपतीकडे तोंड असणाऱ्या भल्यामोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. गणपती मंदिरात नंदी असणारे हे एकमेव मंदिर आहे. हे चित्र पाहता क्षणी असे वाटते की उंदीर व नंदी जणू मयुरेश्वराचे पहारेकरीच आहेत. या मंदिरातील मयुरेश्वराच्या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असून मूर्तीच्या नाभीत व डोळ्यात हिरे जडवले आहेत. तसेच या मूर्तीवर नागाचे संरक्षण छत्र आहे. मंदिरात रिद्धी आणि सिद्धी यांच्याही मुर्त्या आहेत. हा मंदिर परिसर भूस्वनंदा या नावानेही ओळखला जातो. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.
मयूरेश्वर मंदिराची आख्यायिका -
पूर्वी सिंधू नावाच्या एका असुराने पृथ्वीवर हैदोस माजवला होता. या असुराचा नाश करण्यासाठी देवतांनी गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मोरावर आरुढ होऊन सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे येथील गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले. या मंदिरातील मयुरेश्वराच्या मूर्ती संबंधी असेही म्हटले जाते की, ब्रह्मदेवांनी दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती सिंधु असुराने तोडली होती. म्हणून पुन्हा एक मूर्ती बनवण्यात आली. सध्या या मंदिरातील मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्या मूर्तीच्या मागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. पहिली मूर्ती वाळू व लोखंडाचे अंश तसेच हिऱ्या पासून बनवली आहे.
कोरोनामुळे भक्त दर्शनापासून वंचित -
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळासह वर्षभर महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भाविक मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. यंदाचा भाद्रपदी यात्रा उत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. या उत्सव काळात भाविक श्रींच्या दर्शनासाठी मुख्य गाभार्यापर्यंत जात असतात. मात्र, मागील वर्षाप्रमाणे सध्या ही कोरोनाचा प्रादूर्भाव असल्यामुळे भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद आहे. गणेशोत्सव काळात दरवर्षी भाद्रपद शुद्ध ते पंचमी या काळात धार्मिक कार्यक्रम होत असतात. यावेळी सर्व भाविकांना 'श्रीं'च्या मुख्य गाभार्यापर्यंत जाऊन 'श्रीं'च्या मूर्तीला जलस्नान व अभिषेक पूजा घालण्याची परवानगी असते. मात्र, कोरोनामुळे मंदिर प्रवेश बंद असल्याने मंदिर परिसरात भाविकांचा शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
अशा आहेत मयुरेश्वराच्या पूजा विधीच्या वेळा -
मयुरेश्वर मंदिरात नियमितपणे सकाळी ५ वाजता प्रक्षाल पूजा (गणपतीचे स्नान), सकाळी ७ वाजता शोडपचार पूजा, दुपारी १२ वाजता दुसरी शोडपचार पूजा, रात्री ८ वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री १० वाजता शेजारती केली जाते. मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी ७, दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता केली जाते.
मंदिर बंद असल्यामुळे व्यवसाय ठप्प -
अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असणाऱ्या मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक येथे येत असतात. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या उत्तम राहण्याची व भोजनाची सोय खासगी स्तरावर आहे. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची संख्या पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे येथे असणारे हॉटेल्स, लॉज, यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच मंदिरावर अवलंबून असणारे व पूजेसाठी आवश्यक वस्तू (उदा. हार, अगरबत्ती व प्रसादाचे साहित्य) व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येते.
ही आहेत मंदिराची वैशिष्टे -
- अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असणारे मंदिर
- गणपतीच्या मंदिरात नंदी असणारे हे एकमेव मंदिर
- हेमाडपंती मंदिराची रचना मशिदी सारखी
- कऱ्हा नदीकाठी वसलेले मंदिर
- मंदिराला ५० फुटांची तटबंदी
- विजयादशमी आणि सोमवती अमावस्या हे दिवससुद्धा साजरे केले जातात
- वर्षातील नऊ दिवस शहाजीराजे व आदिल शहा यांच्या काळातील सुमारे साडेचारशे वर्षापूर्वीचे अलंकारिक पोषाख चढवले जातात
हेही वाचा - Ganeshotsav 2021 : जाणून घ्या, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास