नवी दिल्ली Soumya Vishwanathan Murder Case : टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन प्रकरणात दोषी ठरलेल्या पाच आरोपींच्या शिक्षेवरील सुनावणी साकेत न्यायालयात पुढं ढकलण्यात आलीय. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. न्यायालयानं दोषींच्या वकिलाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ दिलाय. दोषींची मालमत्ता आणि तुरुंगातील त्यांच्या वागणुकीबाबत दिल्ली पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. त्याची एक प्रत दोषींच्या वकिलाला देण्यात आलीय. यानंतर दोषींच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला, तो न्यायालयानं आज मान्य केला. याशिवाय आरोपींना दंड ठोठावण्यासाठी त्यांच्या मालमत्तेचं मूल्यांकन करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिलेत. याप्रकरणी 18 ऑक्टोबरला अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार पांडे यांनी चार आरोपींना हत्या आणि एका आरोपीला अप्रामाणिकपणे चोरीच्या वस्तू मिळवल्याबद्दल दोषी ठरवलं होतं. यातील पाचही आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत दोषी ठरवलं होतं. आरोपींना कोणत्या कलमांतर्गत शिक्षा झाली, याची कमाल आणि किमान शिक्षा काय असावी, यावरही आज न्यायालयात चर्चा होणार होती. त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती काय आहे आणि त्यांचं आचरण आणि पार्श्वभूमी काय आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याचा निर्णयही न्यायालय सुनावणीत घेऊ शकतं.
कारमध्ये गोळ्या झाडून हत्या : पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची 30 सप्टेंबर 2008 रोजी पहाटे साडेतीन वाजता कामावरून घरी परतत असताना त्यांच्या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येमागे दरोडा हाच हेतू असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र त्यांच्या हत्येप्रकरणी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय शेट्टी या पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मार्च 2009 पासून ते कोठडीत होते. पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला होता. बलजीत आणि इतर दोन आरोपी, रवी कपूर आणि अमित शुक्ला यांना यापूर्वी 2009 मध्ये आयटी एक्झिक्युटिव्ह जिगीशा घोष यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं.
विश्वनाथनच्या हत्येचं प्रकरण कसं आलं उघडकीस : जिगीशा घोष यांच्या हत्येसाठी वापरलेलं हत्यार जप्त केल्यानंच विश्वनाथनच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. 2017 मध्ये जिगिषा घोष हत्याकांडात कोर्टानं कपूर आणि अमित शुक्ला यांना फाशी आणि बलजीत मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, पुढच्याच वर्षी उच्च न्यायालयानं रवी कपूर आणि अमित शुक्ला यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आणि जिगीशा हत्याकांडात बलजीत मलिकची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती.
हेही वाचा :